Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
कुसल मेंडिसच्या हाती श्रीलंकेची कसोटी कमान!

कुसल मेंडिसच्या हाती श्रीलंकेची कसोटी कमान!

पाकिस्तानविरुद्ध होणाऱ्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी श्रीलंका क्रिकेट मंडळाने १५ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. यष्टीरक्षक-फलंदाज कुसल मेंडिस याच्याकडे संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

मेंडिस प्रथमच श्रीलंकेच्या कसोटी संघाचे नेतृत्व करणार असून, तिन्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट प्रकारांत कर्णधारपद भूषवण्याची संधी त्याला मिळाली आहे.

धनंजय डी सिल्वा याने कसोटी कर्णधारपद सोडल्यानंतर मेंडिसची या पदावर नियुक्ती करण्यात आली. डी सिल्वा जानेवारी २०२४ पासून श्रीलंकेच्या कसोटी संघाचे नेतृत्व करत होता. नव्या पिढीकडे नेतृत्वाची जबाबदारी सोपवण्याची गरज असल्याचे त्याने पद सोडताना स्पष्ट केले होते.

श्रीलंका क्रिकेटच्या निवड समितीने गुरुवारी झालेल्या बैठकीत मेंडिसच्या नियुक्तीवर शिक्कामोर्तब केले. मेंडिसला कसोटी क्रिकेटचा चांगला अनुभव असून, त्याने आतापर्यंत ७५ कसोटी सामन्यांत ४,८३६ धावा केल्या आहेत. त्यामध्ये १० शतके आणि २३ अर्धशतकांचा समावेश आहे. यापूर्वी मे महिन्यात त्याच्याकडे श्रीलंकेच्या एकदिवसीय आणि टी-२० संघांचे कर्णधारपद सोपवण्यात आले होते.

पाकिस्तान दौऱ्यात श्रीलंकेला जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या सध्याच्या चक्रात आपली स्थिती मजबूत करण्याची संधी मिळणार आहे. या मालिकेसाठी पथुम निसांकाचा संघात समावेश करण्यात आला असला, तरी पहिल्या कसोटीतील त्याचा सहभाग दुखापतीतून सावरणे आणि वैद्यकीय मंजुरी मिळणे यावर अवलंबून असेल. मालिकेपूर्वी तंदुरुस्त घोषित झाल्यासच तो संघासोबत प्रवास करणार आहे. अंजला बंडारा याला प्रथमच कसोटी संघात स्थान देण्यात आले आहे.

श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यातील पहिली कसोटी ९ नोव्हेंबरपासून रावळपिंडी येथे, तर दुसरी कसोटी १७ नोव्हेंबरपासून लाहोर येथे खेळवण्यात येणार आहे.

कुसल मेंडिस (कर्णधार), पथुम निसांका, पसिंदू सोरियाबंडारा, दिनेश चांदीमल, कामिंदू मेंडिस, सोनल दिनुशा, धनंजय डी सिल्वा, अंजला बंडारा, केशरा नुवांथा, प्रभात जयसूर्या, मिलन रथनायका, लाहिरू कुमारा, असिथा फर्नांडो, दिलशान मदुशंका आणि ईशान मलिंगा.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka