Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
लाल समुद्रात भारतीय ध्वजाच्या जहाजावर हल्ला; १३ भारतीय खलाशी सुरक्षित

लाल समुद्रात भारतीय ध्वजाच्या जहाजावर हल्ला; १३ भारतीय खलाशी सुरक्षित

भारताकडून हल्ल्याचा तीव्र निषेध

येमेनच्या किनाऱ्यालगत लाल समुद्रात (Red Sea) भारतीय ध्वज असलेल्या एमएसव्ही फैझ नूरे ओलिया या मालवाहू जहाजावर मंगळवारी झालेल्या हल्ल्यानंतर जहाज बुडाल्याची गंभीर घटना घडली आहे.

जहाजावरील १४ सदस्यीय कर्मचाऱ्यांपैकी १३ भारतीय आणि एक येमेनी नागरिक यांना सुरक्षितपणे वाचवण्यात आले असून भारताने या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. दरम्यान, येमेनमधील अधिकृत प्रशासनाने या हल्ल्यासाठी हौथी बंडखोरांना जबाबदार धरत त्याला दहशतवादी कारवाई म्हटले आहे.

केंद्रीय बंदरे, जहाजवाहतूक आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय ध्वज असलेले हे यांत्रिक मालवाहू जहाज लाल समुद्रातून प्रवास करत असताना त्यावर एका प्रोजेक्टाइलने (स्फोटक क्षेपणास्त्र) हल्ला करण्यात आला. या हल्ल्यानंतर जहाजाचे संतुलन बिघडले, ते उलटले आणि अखेर समुद्रात बुडाले.

हल्ल्यानंतर येमेनी नौदल आणि तटरक्षक दलाने तातडीने संयुक्त बचावमोहीम राबवली. या मोहिमेत जहाजावरील सर्व १४ खलाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले. त्यानंतर त्यांना येमेनमधील मोखा बंदरात हलविण्यात आले. बचावलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये १३ भारतीय नागरिक आणि एक येमेनी नागरिक असल्याची अधिकृत माहिती देण्यात आली आहे.

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने या हल्ल्याचा कठोर शब्दांत निषेध नोंदवला आहे. मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 'येमेनच्या किनाऱ्याजवळ लाल समुद्रात भारतीय ध्वजावरील व्यावसायिक जहाज 'एमएसव्ही फैझ नूरे ओलिया'वर झालेल्या हल्ल्याचा आम्ही निषेध करतो.' मंत्रालयाने पुढे म्हटले की, लाल समुद्रातील व्यापारी जहाजांवर सातत्याने होत असलेले हल्ले अत्यंत चिंताजनक असून या प्रदेशातील आंतरराष्ट्रीय व्यापारी जहाजांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने प्रभावी उपाययोजना होणे आवश्यक आहे.

परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, रियाधमधील भारतीय दूतावास येमेनी अधिकाऱ्यांच्या सतत संपर्कात असून बचावलेल्या भारतीय खलाशांच्या सुरक्षिततेवर बारकाईने लक्ष ठेवत आहे. तसेच त्यांना सुरक्षितपणे भारतात परत आणण्यासाठी आवश्यक ती सर्व मदत पुरवली जात आहे. मंत्रालयाने जलद बचावकार्याबद्दल येमेनी प्रशासनाचे आभारही मानले आहेत.

निमंत्रण का नाकारतोय दिपके?

सुनेत्रा पवारांना 'गुंगी गुडिया' म्हटल्यावरून हर्षवर्धन सपकाळ लक्ष्य

मुंबईत नव्या सुविधांसह पुन्हा धावणार मोनोरेल

सुनेत्रा पवारांना 'गुंगी गुडिया' म्हटल्यावरून हर्षवर्धन सपकाळ लक्ष्य

येमेनच्या आंतरराष्ट्रीय मान्यता प्राप्त सरकारशी संबंधित नॅशनल रेझिस्टन्स फोर्सने या हल्ल्यासाठी इराणसमर्थित हौथी बंडखोरांना जबाबदार धरले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, जहाजावर दहशतवादी स्वरूपाचा हल्ला करण्यात आला. मात्र, हौथी संघटनेकडून या घटनेची अधिकृत जबाबदारी स्वीकारण्यात आलेली नाही.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka