Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
लवलीनाने उंचावली भारताची शान!

लवलीनाने उंचावली भारताची शान!

NEWS डंका 1 month ago

कॉमनवेल्थ गेम्सच्या उद्घाटनापूर्वीच भारताच्या खात्यात पहिले पदक

कॉमनवेल्थ गेम्स २०२६ च्या उद्घाटन सोहळ्यापूर्वीच भारताच्या खात्यात पहिले पदक जमा झाले आहे. टोकियो ऑलिम्पिक कांस्यपदक विजेती आणि जागतिक विजेती लवलीना बोर्गोहेन हिला महिला ७५ किलो गटात 'बाय' मिळाल्याने ती थेट उपांत्य फेरीत दाखल झाली आहे.

कॉमनवेल्थ गेम्सच्या नियमानुसार उपांत्य फेरीत पराभूत होणाऱ्या दोन्ही खेळाडूंना कांस्यपदक दिले जाते. त्यामुळे एकही सामना न खेळता लवलीनाने भारतासाठी किमान कांस्यपदक निश्चित केले असून, ग्लासगोमध्ये भारताचे पदक खाते उघडणारी ती पहिली खेळाडू ठरली आहे.

महिला ७५ किलो गटात केवळ पाच स्पर्धक असल्यामुळे लवलीनासह तीन खेळाडूंना थेट उपांत्य फेरीत प्रवेश मिळाला. उर्वरित दोन खेळाडूंमध्ये एकमेव उपांत्यपूर्व सामना खेळवण्यात आला. त्यामुळे लवलीनाचे पदक आधीच निश्चित झाले असले, तरी तिचे लक्ष्य केवळ कांस्यावर न थांबता सुवर्णपदकावरच आहे.

३१ जुलै रोजी होणाऱ्या उपांत्य फेरीत लवलीनासमोर ताफाकी हिचे आव्हान असेल. या लढतीत विजय मिळाल्यास ती अंतिम फेरीत प्रवेश करून किमान रौप्यपदक निश्चित करेल. अंतिम सामन्यात विजय मिळविल्यास भारताच्या गळ्यात सुवर्णपदकाची माळ पडेल. त्यामुळे देशाच्या लाखो क्रीडाप्रेमींच्या नजरा आता लवलीनाच्या पुढील लढतीकडे लागल्या आहेत.

लवलीनासाठी हे कॉमनवेल्थ गेम्समधील पहिलेच पदक ठरणार आहे. गोल्ड कोस्ट २०१८ स्पर्धेत तिला उपांत्यपूर्व फेरीत इंग्लंडच्या सॅंडी रायनकडून पराभव स्वीकारावा लागला होता. त्यानंतर बर्मिंगहॅम २०२२ स्पर्धेतही ती पहिल्याच फेरीत बाहेर पडली होती. मात्र यंदा तिने त्या दोन्ही अपयशांवर मात करत कॉमनवेल्थमध्ये अखेर पदक निश्चित केले आहे.

लवलीनाच्या कारकिर्दीतील हा आणखी एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. तिने टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक, २०२३ जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक आणि २०२३ आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक जिंकले आहे. आता कॉमनवेल्थ गेम्सचे पदकही तिच्या नावावर जमा झाल्याने ऑलिम्पिक, जागतिक स्पर्धा, आशियाई क्रीडा स्पर्धा आणि कॉमनवेल्थ अशा सर्व प्रमुख बहुक्रीडा स्पर्धांमध्ये पदक जिंकण्याचा मान तिने मिळवला आहे.

दरम्यान, गुरुवारी होणाऱ्या कॉमनवेल्थ गेम्सच्या उद्घाटन सोहळ्यात लवलीना आणि टोकियो ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती वेटलिफ्टर मीराबाई चानू भारतीय पथकाचे ध्वजवाहक म्हणून मैदानात उतरणार आहेत. उद्घाटनापूर्वीच भारताचे पदक खाते उघडणाऱ्या लवलीनाकडून आता सुवर्णपदकाची अपेक्षा व्यक्त केली जात असून, देशवासीयांच्या आशा तिच्यावर खिळल्या आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka