रेल्वे स्थानके, रेल्वे रुळ आणि परिसर स्वच्छ व सुरक्षित ठेवण्यासाठी मध्य रेल्वेने 'स्वच्छता पंधरवडा २०२६' आणि 'विशेष अभियान ६.०' अंतर्गत व्यापक स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. मुंबईसह भुसावळ, सोलापूर, पुणे आणि नागपूर मंडळांत विविध स्वच्छता उपक्रम राबविण्यात येत असून, साचलेला कचरा हटविणे, स्थानकांची स्वच्छता सुधारणे आणि रेल्वे परिसराचे सौंदर्य जपण्यावर विशेष भर देण्यात येत आहे.
स्वच्छता पंधरवडा १५ ऑक्टोबरपर्यंत, तर विशेष अभियान ६.० हे ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत सुरू राहणार आहे. या उपक्रमांत रेल्वे अधिकारी, कर्मचारी, हाउसकीपिंग कर्मचारी आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांनी सक्रिय सहभाग घेतला आहे.
मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राजीव श्रीवास्तव यांनी १ ऑक्टोबर रोजी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना स्वच्छतेची शपथ दिली. दरवर्षी १०० तास, म्हणजेच दर आठवड्याला दोन तास स्वेच्छेने स्वच्छतेसाठी देण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. स्वतःपासून सुरुवात करून कुटुंब, परिसर, गाव आणि कार्यस्थळ स्वच्छ ठेवण्याचे आवाहनही करण्यात आले.
'एक दिवस, एक तास' या उपक्रमांतर्गत रेल्वे गाड्या, स्थानके आणि रेल्वे परिसरात स्वच्छता उपक्रम राबविण्यात आले. 'एक पेड माँ के नाम' अभियानांतर्गत वृक्षारोपणही करण्यात आले.
मुंबई मंडळात स्थानकांचे फलाट, पायऱ्या, शौचालये आणि प्रवाशांच्या वर्दळीच्या ठिकाणांची स्वच्छता करण्यात आली. तारघर आणि मुलुंड स्थानकांवर विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी), माटुंगा, ठाणे, कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, आंबिवली, शहाड, ठाकुर्ली, विठ्ठलवाडी, नाहूर, विद्याविहार, शेलू आणि सोमाटणे यांसह विविध ठिकाणी रेल्वे रुळांलगत साचलेला कचरा हटविण्यात आला.
कचरा साचण्याची शक्यता असलेल्या संवेदनशील ठिकाणांची विशेष स्वच्छता करून कचऱ्याचे संकलन, वर्गीकरण आणि योग्य विल्हेवाट लावण्यावर भर देण्यात आला. स्थानकांकडे जाणारे मार्ग आणि परिसरातील अस्वच्छता दूर करण्यासाठीही उपाययोजना करण्यात आल्या.
सानपाडा कारशेडमध्ये ६ ते ८ ऑक्टोबरदरम्यान विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत सुमारे ३० ते ४० कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. साचलेला गाळ, मलबा, झुडपे आणि अनावश्यक वनस्पती हटविण्यासाठी जेसीबी मशीनचा वापर करण्यात आला. कार्यशाळेच्या परिसरासह रेल्वे रुळांभोवतीची स्वच्छता करण्यात आली.
९ ऑक्टोबर रोजी मुंबई मंडळातील विविध ठिकाणी विशेष मोहीम राबवून स्थानकांच्या भिंती, खांब, फलाट, पायऱ्या आणि सार्वजनिक ठिकाणांवरील अनधिकृत पोस्टर, बॅनर, स्टिकर आणि जाहिराती हटविण्यात आल्या. रेल्वे परिसर स्वच्छ आणि सुस्थितीत ठेवण्यासाठी गुटखा व थुंकीचे डागही साफ करण्यात आले.
मुंबई मंडळाप्रमाणेच मध्य रेल्वेच्या भुसावळ, सोलापूर, पुणे आणि नागपूर मंडळांतही विविध स्वच्छता उपक्रम राबविण्यात आले. या मोहिमांमुळे रेल्वे रुळांलगतचा जुना कचरा हटविणे, स्थानक परिसराची स्वच्छता सुधारणे आणि कामाच्या ठिकाणी अधिक सुरक्षित व आरोग्यदायी वातावरण निर्माण करण्यास मदत झाली आहे.
मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील निला यांनी १३ ऑक्टोबर रोजी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून ही माहिती दिली.

