Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
महाकाल दर्शनाहून परतताना भीषण अपघात; ६ भाविकांचा मृत्यू

महाकाल दर्शनाहून परतताना भीषण अपघात; ६ भाविकांचा मृत्यू

NEWS डंका 2 weeks ago

चुकीच्या दिशेने आलेल्या भरधाव ट्रॉलीची ईको व्हॅनला जोरदार धडक

मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील बदनावर-उज्जैन फोरलेन महामार्गावर रविवारी दुपारी भीषण अपघात झाला. पंचकवासा गावाजवळ भरधाव आणि अनियंत्रित ट्रॉला चुकीच्या दिशेने येत असताना समोरून येणाऱ्या मारुती ईको व्हॅनला त्याने जोरदार धडक दिली.

धडक इतकी भीषण होती की ईको व्हॅनचा अक्षरशः चुराडा झाला. या दुर्घटनेत व्हॅनमधील सहा तरुणांचा जागीच मृत्यू झाला, तर आणखी एक तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर बदनावर येथील सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत आणि जखमी झालेले सर्व तरुण गुजरातमधील वडोदरा येथील रहिवासी होते. हे सर्वजण उज्जैन येथे भगवान महाकालाचे दर्शन घेऊन ईको व्हॅनमधून आपल्या घरी वडोदराकडे परतत होते. मात्र, परतीचा हा प्रवास पंचकवासा गावाजवळच काळाच्या दाढेत संपला. समोरून चुकीच्या लेनमध्ये वेगाने येणाऱ्या ट्रॉल्याने त्यांच्या वाहनाला धडक दिल्याने काही क्षणांतच संपूर्ण व्हॅन उद्ध्वस्त झाली आणि सहा कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला.

ममता बॅनर्जींच्या ताफ्यावर चिखल-बूटफेक?

भारतीय संघाला दिलासा, शुभमन गिलने सुरू केला सराव

कोकणच्या मातीतली गूढ 'बायंगी'ची लोककथा मोठ्या पडद्यावर

अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांनीही मदतीसाठी धाव घेतली. दुर्घटनेनंतर महामार्गावर काही काळ मोठी गर्दी आणि वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू केले. प्राथमिक माहितीनुसार ट्रॉला चुकीच्या दिशेने आणि वेगाने येत असल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले जात असले, तरी नेमके कारण आणि चालकाची भूमिका याबाबत पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.

महाकालाच्या दर्शनानंतर आनंदाने घरी परतणाऱ्या तरुणांचा प्रवास एका भीषण अपघातामुळे अचानक संपल्याने वडोदरा परिसरातही शोककळा पसरली आहे. एकाच दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाल्याने धार जिल्ह्यातील या अपघाताने पुन्हा एकदा महामार्गावरील वेग, चुकीच्या लेनमधून वाहन चालवणे आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन किती जीवघेणे ठरू शकते, याचा गंभीर इशारा दिला आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka