सत्ताबदलानंतर धार्मिक वातावरण बदलल्याची चर्चा
पश्चिम बंगालमध्ये यंदा गणेशोत्सवाचा उत्साह मोठ्या प्रमाणात वाढल्याचे चित्र आहे. गेल्या वर्षी राज्यात सुमारे ३० हजार गणेशपूजा झाल्या होत्या, तर यंदा हा आकडा १ लाखांहून अधिक झाल्याची माहिती समोर आली आहे.
अवघ्या वर्षभरात गणेशपूजेच्या आयोजनात झालेली ही मोठी वाढ आता चर्चेचा विषय ठरत आहे. पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांनी ही माहिती दिली आहे.
विशेष म्हणजे, यंदा पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचे सरकार सत्तेत नसून भाजपचे सरकार सत्तेत आहे. त्यामुळे गणेशपूजांच्या वाढत्या आयोजनाकडे केवळ धार्मिक उत्सवाचा विस्तार म्हणूनच नव्हे, तर राज्यातील बदललेल्या राजकीय आणि सामाजिक वातावरणाच्या पार्श्वभूमीवरही पाहिले जात आहे.
यंदा कोलकाता आणि आसपासच्या भागात गणेशपूजेच्या आयोजनात विशेष वाढ झाल्याचे वृत्त आहे. गेल्या वर्षी या भागात सुमारे ३५० गणेशपूजा झाल्या होत्या. यंदा ही संख्या ८००हून अधिक झाली आहे. अनेक नवीन मंडळांनी पहिल्यांदाच गणेशपूजेचे आयोजन केले आहे. बंगालमध्ये पारंपरिकरित्या दुर्गापूजेला सर्वाधिक महत्त्व आहे. मात्र, यंदा गणेशपूजेचा वाढलेला विस्तार राज्यातील सार्वजनिक उत्सवांच्या बदलत्या स्वरूपाकडे लक्ष वेधत आहे. विशेषतः सत्ताबदलानंतर हिंदू धार्मिक उत्सवांबाबतच्या सार्वजनिक वातावरणात बदल दिसत असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
यापूर्वी राज्यात सत्तेत असलेल्या तृणमूल काँग्रेस सरकारच्या काळात हिंदू धार्मिक उत्सवांशी संबंधित काही निर्णयांवरून मोठे वाद निर्माण झाले होते. विशेषतः दुर्गामूर्ती विसर्जनाच्या मुद्द्यावर ममता बॅनर्जी सरकारला कलकत्ता उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपाला सामोरे जावे लागले होते. २०१७ मध्ये मोहर्रमच्या पार्श्वभूमीवर विजयादशमीच्या दिवशी रात्री १० नंतर दुर्गामूर्ती विसर्जनावर निर्बंध घालण्यात आले होते. दुसऱ्या दिवशीही विसर्जनाला बंदी होती. मात्र, उच्च न्यायालयाने हे निर्बंध रद्द करत दुर्गामूर्ती विसर्जनाला परवानगी दिली.
जम्मू- काश्मीरच्या राजौरीमध्ये लष्करशी संबंधित तिघांना अटक
गुरुग्राममध्ये महिला बाईकस्वाराला धडक देणाऱ्या कल्याण बैंसलाला अटक
अफगाणिस्तानात केरळच्या महिला व्लॉगरला अटकेची धमकी
इमिग्रेशन न करताच तीन इटालियन नागरिक म्युनिकला रवाना
याआधी २०१६ मध्येही विजयादशमी आणि मोहर्रम एकाच काळात आल्याने दुर्गामूर्ती विसर्जनाच्या वेळेवर निर्बंध घालण्यात आले होते. या निर्णयालाही न्यायालयात आव्हान देण्यात आले आणि कलकत्ता उच्च न्यायालयाने सरकारचे निर्बंध मनमानी असल्याचे नमूद करत ते उठवले होते. मात्र, आता सत्तापालट होताच गणेशपूजेंच्या संख्येत झालेल्या वाढीमुळे हिंदू धार्मिक उत्सवांबाबतच्या वातावरणात बदल झाल्याचे बोलले जात आहे.

