Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
मोदींना लक्ष्य करणारी रुचिका अखेर नरमली; हात जोडून मागितली माफी

मोदींना लक्ष्य करणारी रुचिका अखेर नरमली; हात जोडून मागितली माफी

NEWS डंका 2 months ago

जंतर-मंतरवरील घोषणाबाजी प्रकरण

दिल्लीतील जंतर-मंतर येथे २३ जुलै रोजी झालेल्या आंदोलनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात कथित अपमानास्पद घोषणा दिल्याचा आरोप असलेल्या रुचिका सिंग हिने एका व्हिडिओद्वारे सार्वजनिक माफी मागितली आहे.

या व्हिडिओमध्ये तिने आपण केवळ १५ वर्षांची असल्याचा दावा करत, इतरांच्या प्रभावाखाली येऊन आपण चुकीची वक्तव्ये केल्याची कबुली दिली आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये रुचिका सिंग हात जोडून माफी मागताना दिसते. ती सांगते की, कनॉट प्लेसला भेट दिल्यानंतर ती आपल्या मित्रांसोबत जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी झाली होती. आंदोलनस्थळी पंतप्रधानांविरोधात घोषणा देणाऱ्या लोकांच्या प्रभावाखाली आपण गेलो आणि त्याच भावनेतून आपणही अपमानास्पद वक्तव्ये केली, असे तिने म्हटले. 'मी त्या लोकांच्या प्रभावाखाली आले. मी फक्त १५ वर्षांची आहे. मी जे काही केले ते क्षम्य नव्हते. मी खूप वाईट गोष्टी बोलले आहे,' असे ती व्हिडिओमध्ये म्हणताना दिसते. पुढे तिने ही आपली 'पहिली आणि शेवटची चूक' असल्याचे सांगत संपूर्ण देशाची माफी मागितली. 'मी संपूर्ण देशाची माफी मागते. मला खूप लाज वाटते. मी स्वतःकडे पाहूही शकत नाही. कृपया मला माफ करा,' असेही ती म्हणाली.

दरम्यान, शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ संदेश प्रसिद्ध केला होता. या संदेशात त्यांनी आंदोलनादरम्यान त्यांच्याविरोधात आणि त्यांच्या दिवंगत आईविरोधात अपमानास्पद भाषा वापरणाऱ्या विद्यार्थ्यांना आपण माफ केल्याचे सांगितले. समाजाने अशा तरुणांना शिक्षा देण्याऐवजी त्यांना योग्य मार्गदर्शन करावे, असे आवाहनही त्यांनी केले. 'माझ्या आणि माझ्या दिवंगत आईविरुद्ध वापरण्यात आलेल्या अपमानास्पद घोषणा अत्यंत त्रासदायक होत्या. मात्र, तरुणांना त्यांच्या चुकांमधून शिकण्याची संधी दिली पाहिजे,' असे पंतप्रधान मोदी म्हणाले होते. त्यांच्या या संदेशानंतर अवघ्या काही तासांत रुचिका सिंगचा माफीचा व्हिडिओ समोर आला.

तरुणीवर झिरो एफआयआर दाखल

या प्रकरणात २९ जुलै रोजी नोएडातील एक्सप्रेसवे पोलीस ठाण्यात रुचिका सिंगविरोधात झिरो एफआयआर दाखल करण्यात आला होता. तक्रारीनुसार, तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात अपमानास्पद भाषा वापरून घटनात्मक पदाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचवण्याचा प्रयत्न केला. तसेच, तिची वक्तव्ये हेतुपुरस्सर द्वेष पसरवण्यासाठी आणि सार्वजनिक शांतता भंग करण्याच्या उद्देशाने करण्यात आल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

दिशाभूल झालेल्यांना योग्य दिशा दाखवूया, भारतासाठी एकत्र येऊया

वंदे भारत ठरली लाईफलाईन; प्रथमच जिवंत हृदयाची वाहतूक

'आप' नेता ताहीर हुसेनला अंकित शर्मा हत्येप्रकरणी जन्मठेप

कोकण रेल्वेचे तिकीट नाही…तीन गाड्या, चाकरमानी वाऱ्यावर; बेलापूरमध्ये उपोषण

या प्रकरणी पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम ३५२, ३५३(१) आणि ३५६(१) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर पुढील तपासासाठी हा झिरो एफआयआर दिल्लीतील पार्लमेंट स्ट्रीट पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून, तेथील पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. माहितीनुसार, रुचिका सिंग नोएडातील एका गृहनिर्माण सोसायटीत तिच्या आईसोबत राहत होती. मात्र, जंतर-मंतरवरील आंदोलनानंतर ती घरी परतलेली नसल्याचे सुरक्षा कर्मचाऱ्यांनी सांगितले. तिच्या फ्लॅटला सध्या कुलूप असून, तपासाचा भाग म्हणून पोलिसांनी संबंधित सोसायटीला भेट देत रहिवाशांचीही चौकशी केली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka