Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
मुंबईकरांना दिलासा! धरणांतील पाणीसाठा ८३% पार

मुंबईकरांना दिलासा! धरणांतील पाणीसाठा ८३% पार

NEWS डंका 1 month ago

धरणक्षेत्रातील दमदार पावसामुळे जलसाठ्यात मोठी वाढ

मुंबईकरांसाठी मोठा दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून धरणांच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरणांतील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली असून एकूण साठा तब्बल ८३.६८ टक्क्यांवर पोहोचला आहे.

त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात मुंबईच्या पाणीपुरवठ्याबाबत निर्माण झालेली अनिश्चितता मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे.

मुंबईच्या पाणीपुरवठ्याचा मुख्य आधार असलेले भातसा धरण सध्या ८२ टक्क्यांहून अधिक भरले असून, शहराच्या पाण्याच्या गरजेचा मोठा भाग भागविणाऱ्या या धरणातील वाढता साठा महत्त्वाचा मानला जात आहे. याशिवाय मोडक सागर, विहार आणि तुळशी ही धरणे शंभर टक्के भरली आहेत, तर तानसा धरण ९८ टक्क्यांहून अधिक आणि मध्य वैतरणा धरण ८० टक्क्यांपेक्षा अधिक भरले आहे. उर्ध्व वैतरणा धरणातही पाणीसाठ्यात सातत्याने वाढ होत आहे.

विद्यार्थ्यांचे आंदोलन हायजॅक… दिपकेची पन्नूशी हातमिळवणी ?

एनटीएमध्ये मोठी कारवाई; ४७ अधिकाऱ्यांची हकालपट्टी

यंदाच्या मान्सूनच्या सुरुवातीला पावसाने उशिरा हजेरी लावल्यामुळे मुंबईवर पाणीटंचाईचे संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली होती. परिणामी महापालिकेला पाणी कपातीसारखे कठोर निर्णय घ्यावे लागले होते. मात्र जुलै महिन्याच्या उत्तरार्धात धरणक्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे परिस्थितीत झपाट्याने सुधारणा झाली आहे. काही आठवड्यांतच धरणांतील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ झाली असून मुंबईच्या भविष्यातील पाणीपुरवठ्याला मोठा आधार मिळाला आहे.

जलसाठ्यातील ही वाढ मुंबई महानगरपालिकेसाठीही दिलासादायक ठरली आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास धरणे पूर्ण क्षमतेने भरतील आणि शहराच्या पाणीपुरवठ्याबाबत दीर्घकालीन नियोजन अधिक सक्षमपणे करता येईल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. मात्र सध्याचा साठा समाधानकारक असला तरी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन प्रशासनाकडून कायम ठेवण्यात आले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka