Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
मुंबईत मुसळधार पावसाचा कहर, ५ दिवसाचा रेड अलर्ट

मुंबईत मुसळधार पावसाचा कहर, ५ दिवसाचा रेड अलर्ट

अंधेरी सबवे बंद, भरतीमुळे शहरातील जनजीवन विस्कळीत

मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसाने पुन्हा एकदा शहराची दैनंदिन गती विस्कळीत केली आहे. सलग कोसळणारा पाऊस आणि समुद्रातील उंच भरती यांचा दुहेरी फटका बसल्याने अनेक सखल भाग जलमय झाले असून अंधेरी सबवे पूर्णपणे पाण्याखाली गेल्याने प्रशासनाने तो वाहतुकीसाठी बंद केला आहे.

त्यामुळे अंधेरी पूर्व आणि पश्चिम यांमधील महत्त्वाचा रस्ता बंद पडला असून हजारो प्रवाशांना पर्यायी मार्गांचा वापर करावा लागत आहे. परिणामी एस. व्ही. रोडसह अनेक प्रमुख मार्गांवर वाहतूक कोंडी निर्माण झाली असून नागरिकांना तासन्तास अडकून पडावे लागत आहे.

दुपारी आलेल्या सुमारे ४.२२ मीटर उंच भरतीमुळे परिस्थिती आणखी गंभीर झाली. समुद्रातील पाणी ड्रेनेज लाईनमधून उलट शहरात शिरल्याने पावसाचे पाणी वाहून जाण्याऐवजी अनेक भागांत साचून राहिले. अंधेरी सबवे, मलाड सबवे, जुहू-खार लिंक रोड, एस. व्ही. रोड आणि अंधेरी पश्चिम परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. पाण्याचा निचरा मंदावल्यामुळे अनेक वाहनं अर्ध्या रस्त्यात बंद पडली.

बोरिवलीच्या वसंत मार्व्हल रोडवर केबल चोरी, १ कोटींचा मुद्देमाल जप्त

सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा मोठी घसरण

मुंबई पोलिस आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेने अंधेरी सबवेच्या दोन्ही बाजूंना बॅरिकेड्स लावून वाहतूक पूर्णपणे बंद केली. तरीही काही नागरिकांनी जीव धोक्यात घालून पाण्यातून पायी मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. अशाच एका घटनेत पाण्याखाली लपलेल्या खड्ड्यात पडून एक व्यक्ती जखमी झाली. प्रशासनाने नागरिकांना जलमय भागात जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे.

या पावसाचा फटका केवळ मुंबईपुरता मर्यादित राहिलेला नाही. नवी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, बदलापूर आणि भिवंडी येथेही अनेक सखल भागांत पाणी साचले आहे. नवी मुंबईतील सानपाडा सबवे आणि सायन-पनवेल मार्गावरील सर्व्हिस रोड पाण्याखाली गेल्याने वाहतूक विस्कळीत झाली. भिवंडीतील तीनबत्ती भाजी मार्केटमध्ये पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून बाजारपेठेतील व्यवहारांवर परिणाम झाला आहे. ठाणे जिल्ह्यात काही ठिकाणी झाडे कोसळल्याच्या घटनाही घडल्या आहेत.

दरम्यान, हवामान विभागाने मुंबई महानगर प्रदेश आणि कोकणासाठी पुढील पाच दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली असून नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, जलमय रस्ते टाळावेत आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka