Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
नाडाकडून यशस्वी जायसवाल आणि शेफाली वर्माला नोटीस

नाडाकडून यशस्वी जायसवाल आणि शेफाली वर्माला नोटीस

NEWS डंका 2 weeks ago

भारतीय क्रिकेटमधील दोन युवा स्टार खेळाडू — यशस्वी जायसवाल आणि शेफाली वर्मा — यांना नॅशनल अँटी-डोपिंग एजन्सी (नाडा) कडून नोटीस बजावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. अँटी-डोपिंग नियमांनुसार दिलेल्या ठिकाणी अनुपस्थित राहिल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचे वृत्त आहे.

यशस्वी जायसवाल आणि शेफाली वर्मा हे दोघेही सध्या नाडाच्या रजिस्टर्ड टेस्टिंग पूलमध्ये आहेत. या पूलमध्ये असलेल्या खेळाडूंना त्यांच्या वास्तव्याची आणि प्रवासाची माहिती नियमितपणे नाडाला द्यावी लागते, जेणेकरून कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांची डोप टेस्ट करता येईल.

नियमांनुसार खेळाडूंना प्रत्येक तिमाहीत घराचा पत्ता, ई-मेल, मोबाईल नंबर, मुक्कामाचे ठिकाण, स्पर्धांचे वेळापत्रक आणि दररोज एक ६० मिनिटांचा स्लॉट द्यावा लागतो, ज्यावेळी ते टेस्टिंगसाठी उपलब्ध असतील.

मात्र, अहवालानुसार डोप कंट्रोल अधिकारी १७ डिसेंबर २०२५ रोजी यशस्वी जायसवाल यांच्या टेस्टसाठी पोहोचले होते, तर ७ नोव्हेंबर २०२५ रोजी शेफाली वर्माच्या टेस्टसाठी अधिकारी गेले होते. पण दोघेही त्यांनी दिलेल्या ठिकाणी उपस्थित नव्हते.

यानंतर नाडाने १८ आणि २० फेब्रुवारी रोजी दोन्ही खेळाडूंना स्पष्टीकरण मागितले होते. मात्र, दोघांकडूनही कोणतेही उत्तर न आल्याने नाडाने अधिकृतपणे त्यांचा 'पहिला मिस्ड टेस्ट' नोंदवला आहे.

या प्रकरणाची माहिती बीसीसीआय आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद यांनाही देण्यात आली आहे. दोन्ही खेळाडूंना आता सात दिवसांत उत्तर देण्यास सांगितले आहे.

नाडाच्या नियमांनुसार, १२ महिन्यांच्या कालावधीत एखाद्या खेळाडूचे तीन मिस्ड टेस्ट झाल्यास ते अँटी-डोपिंग नियमांचे उल्लंघन मानले जाते. अशा प्रकरणात संबंधित खेळाडूवर तब्बल चार वर्षांपर्यंत बंदीची कारवाई होऊ शकते.

भारतीय क्रिकेटमधील दोन उदयोन्मुख स्टार्सवर आलेल्या या नोटिसींमुळे क्रीडा वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka