Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
ओल्ड मॉन्क, रॉयल चॅलेंजवर FSSAI चा दणका

ओल्ड मॉन्क, रॉयल चॅलेंजवर FSSAI चा दणका

NEWS डंका 2 weeks ago

कृत्रिम फ्लेवर आणि लेबलिंग नियमांचे कथित उल्लंघन

देशातील मद्य उद्योगाला मोठा धक्का देणारी कारवाई करत भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) ने काही लोकप्रिय रम आणि व्हिस्की ब्रँड्सच्या विशिष्ट उत्पादनांच्या विक्रीवर बंदी घातली आहे.

ओल्ड मॉन्क, मॅकडॉवेल्स नं. १ रम, बॅगपाइपर डिलक्स, रॉयल चॅलेंज आणि अँटीक्विटी ब्ल्यू या लोकप्रिय ब्रँड्सच्या काही उत्पादनांवर ही कारवाई करण्यात आली असून, नियमांचे उल्लंघन आणि दिशाभूल करणाऱ्या लेबलिंगचा आरोप करण्यात आला आहे.

एफएसएसएआयच्या तपासात संबंधित उत्पादकांनी रम आणि व्हिस्कीला नैसर्गिकरीत्या परिपक्व (Aged) झाल्यासारखी चव आणि सुगंध देण्यासाठी कृत्रिम अथवा 'नेचर आयडेंटिकल' फ्लेवरिंगचा वापर केल्याचा आरोप आहे. अन्न सुरक्षा नियमांनुसार रम, व्हिस्की, ब्रँडी किंवा जिन यांसारख्या मद्यांमध्ये त्यांची वैशिष्ट्यपूर्ण चव आणि सुगंध हा उत्पादन प्रक्रियेतून आणि मूळ घटकांमधून यायला हवा. अशा मद्यामध्ये कृत्रिम फ्लेवर मिसळण्यास परवानगी नसल्याचे एफएसएसएआयने स्पष्ट केले आहे.

युद्धाच्या संकटात भारताची कमाई! जुलैमध्ये इंधन निर्यात वर्षभरातील सर्वोच्च स्तरावर

फुकेत-दिल्ली एअर इंडियाच्या विमानाला एअर टर्ब्युलन्सचा तडाखा

शिक्षण, आरोग्य, समाजकारणातील युगाचा अंत; डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन

तपासादरम्यान काही उत्पादनांच्या लेबलिंगबाबतही गंभीर आक्षेप नोंदवण्यात आले. ग्राहकांना उत्पादनाची खरी गुणवत्ता आणि निर्मिती प्रक्रिया समजेल अशी माहिती लेबलवर देणे बंधनकारक असताना, काही उत्पादनांमध्ये त्याचा अभाव आढळल्याचा दावा करण्यात आला आहे. अशा उत्पादनांना पारंपरिक रम किंवा व्हिस्की म्हणून विकण्याऐवजी 'फ्लेवर्ड स्पिरिट' म्हणून विक्री करणे आवश्यक असल्याचे नियामक संस्थेचे मत आहे.

या कारवाईमुळे सर्व राज्यांतील सर्व बाटल्यांच्या विक्रीवर बंदी लागू झाली आहे का, की ती केवळ काही विशिष्ट उत्पादन केंद्रांमध्ये तयार झालेल्या बॅचपुरती मर्यादित आहे, याबाबत अद्याप स्पष्टता देण्यात आलेली नाही. त्यामुळे या निर्णयाची अंमलबजावणी कोणत्या प्रमाणात होणार, याकडे मद्य उद्योग आणि ग्राहकांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, संबंधित कंपन्यांनी आपण विद्यमान नियमांचे पालन केले असल्याचा दावा करत एफएसएसएआयच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यांच्या मते हा वाद उत्पादनाच्या सुरक्षिततेशी संबंधित नसून नियमांच्या व्याख्या आणि लेबलिंगशी संबंधित आहे. अंतिम न्यायालयीन किंवा नियामक निर्णयानंतरच या उत्पादनांच्या विक्रीबाबत पुढील चित्र स्पष्ट होणार आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka