Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पदार्पणात निकीचा झिम्बाब्वेला 'प्रसाद'!

पदार्पणात निकीचा झिम्बाब्वेला 'प्रसाद'!

पआंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या निकी प्रसादने पहिल्याच सामन्यात आपल्या दमदार खेळाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात भारतीय संघ अडचणीत असताना निकीने दाखवलेला आत्मविश्वास आणि संयमी फलंदाजी पाहून अनुभवी अष्टपैलू दीप्ती शर्मा प्रभावित झाली.

'निकी खेळत असताना ती पदार्पणाचा सामना खेळत आहे, असे अजिबात वाटले नाही,' अशा शब्दांत दीप्तीने तिचे कौतुक केले.

रायपूर येथे शुक्रवारी झालेल्या या सामन्यात झिम्बाब्वेने भारतासमोर विजयासाठी ११५ धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र, लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची अवस्था १९ धावांत चार गडी बाद अशी बिकट झाली. सुरुवातीच्या धक्क्यांमुळे भारतीय संघावर पराभवाचे सावट निर्माण झाले होते. अशा परिस्थितीत निकी प्रसाद आणि दीप्ती शर्मा यांनी संयमाने फलंदाजी करत डाव सावरला आणि भारताला विजयाच्या उंबरठ्यावर आणून ठेवले.

दोघींनी सहाव्या विकेटसाठी ६३ चेंडूंत ८२ धावांची निर्णायक भागीदारी केली. दीप्तीने ३७ चेंडूंत आठ चौकारांसह ४९ धावांची खेळी केली, तर निकीने ३५ चेंडूंत सहा चौकारांच्या मदतीने नाबाद ३९ धावा केल्या. निकीने शेवटपर्यंत मैदानावर टिकून राहत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. भारतीय संघाने १५.४ षटकांत सहा विकेट गमावत ११६ धावा केल्या आणि चार विकेट्सनी सामना जिंकला.

सामन्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना दीप्ती म्हणाली, 'निकीने खूप चांगला खेळ केला. खरे सांगायचे तर, ती पदार्पणाचा सामना खेळत आहे, असे अजिबात वाटले नाही. तिने यापूर्वीही देशासाठी अनेक सामने खेळले आहेत, असे वाटत होते. एका युवा खेळाडूमध्ये असा आत्मविश्वास असणे ही मोठी गोष्ट आहे. संघाला गरज असताना भागीदारी उभारणे आणि कठीण परिस्थितीतून संघाला विजय मिळवून देणे, हे तिचे कौशल्य उल्लेखनीय आहे. या सामन्यातून तिला निश्चितच मोठा आत्मविश्वास मिळेल.'

या सामन्यात दीप्तीने फलंदाजीसोबतच गोलंदाजीतही महत्त्वपूर्ण योगदान दिले. तिने चार षटकांत केवळ २२ धावा दिल्या. तिला एकही विकेट मिळाली नसली, तरी झिम्बाब्वेच्या फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखण्यात तिची गोलंदाजी महत्त्वाची ठरली. या अष्टपैलू कामगिरीसाठी दीप्तीला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.

पदार्पणाच्या सामन्यातच दबावाखाली शांत राहून संघाला विजय मिळवून देणाऱ्या निकीच्या खेळीने भारतीय महिला क्रिकेटच्या भविष्यातील आशा अधिक बळकट केल्या आहेत. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेत १-० अशी आघाडी घेतली असून, मालिकेतील दुसरा सामना रविवारी रायपूरमध्येच खेळवण्यात येणार आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka