Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वामध्ये स्फोट; सात जणांचा मृत्यू

पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वामध्ये स्फोट; सात जणांचा मृत्यू

स्फोटात २३ जण जखमी

पाकिस्तानमधील खैबर पख्तूनख्वा प्रांतातील लक्की मरवत जिल्ह्यातील सराय नौरंग तहसीलमध्ये मंगळवार, १२ मे रोजी भीषण स्फोट झाला. या स्फोटात दोन पोलिस कर्मचाऱ्यांसह ७ जणांचा मृत्यू झाला असून २३ जण जखमी झाले आहेत, अशी माहिती स्थानिक पोलिसांच्या हवाल्याने माध्यमांनी दिली आहे.

जिल्हा पोलिस अधिकारी कार्यालयाचे प्रवक्ते कुदरतुल्लाह खान यांनी निवेदनात सांगितले की, या घटनेत आणखी २३ जण जखमी झाले आहेत.

घटनेच्या स्वरूपाबाबत बोलताना त्यांनी सांगितले, 'स्फोटकांनी भरलेला लोडर रिक्षा उभा होता की एखाद्या आत्मघाती हल्लेखोराने स्वतःला उडवून दिले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सध्या बॉम्ब निकामी पथकाचे तज्ज्ञ स्फोटाचे स्वरूप तपासत आहेत.' मृत पोलिस कर्मचाऱ्यांची ओळख आदिल जान आणि राहतुल्लाह अशी झाली आहे. मृतदेह तहसील मुख्यालय रुग्णालयात पाठवण्यात आले असून काही जखमींना बन्नू येथील रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये एका किशोरीचा आणि एका महिलेचाही समावेश आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओंमध्ये स्फोटामुळे अनेक दुकाने आणि तीनचाकी वाहनांचे मोठे नुकसान झाल्याचे दिसून आले. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, नौरंग सर्कलचे डेप्युटी सुपरिटेंडंट ऑफ पोलिस यांच्या नेतृत्वाखाली मोठा पोलीस बंदोबस्त घटनास्थळी पोहोचला. पोलिसांनी परिसराला घेराव घालत पुरावे गोळा करण्यास सुरुवात केली आहे. यापूर्वी रेस्क्यू ११२२ चे प्रवक्ते शाहदाब खान यांनी स्फोटाची पुष्टी करत सांगितले होते की, 'रुग्णवाहिका आणि बचाव पथके घटनास्थळी रवाना करण्यात आली आहेत.' त्यांनी नागरिकांना बचाव यंत्रणांना सहकार्य करण्याचे आणि स्फोटस्थळापासून दूर राहण्याचे आवाहन केले.

पेपर लीक प्रकरणानंतर NEET-UG 2026 परीक्षा रद्द

हिमंता बिस्वा सरमा यांनी सलग दुसऱ्यांदा घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ

इराणच्या आयआरजीसीची माहिती द्या, १.५ कोटी डॉलर कमवा!

पाकिस्तानची डबल ढोलकी, इराणला हवाई तळ दिला!

खैबर पख्तूनख्वाचे मुख्यमंत्री सोहैल आफ्रिदी यांनी या घटनेची दखल घेत पोलिस महासंचालकांकडून (IGP) अहवाल मागवला आहे. त्यांनी जीवितहानीबद्दल दुःख व्यक्त करत मृतांच्या कुटुंबियांना प्रांतीय सरकारतर्फे 'पूर्ण मदत' देण्याचे आश्वासन दिले. तसेच जखमींना योग्य वैद्यकीय उपचार देण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. ही घटना शनिवारी रात्री बन्नू येथील फतेह खेल पोलिस पोस्टवर झालेल्या आत्मघाती हल्ल्यानंतर काही दिवसांतच घडली आहे. त्या हल्ल्यात सुमारे १५ पोलिस कर्मचारी ठार झाले होते. सोमवारी अफगाणिस्तानच्या प्रभारी राजदूतांना बोलावून बन्नू हल्ल्याबाबत 'तीव्र निषेधपत्र' देण्यात आले होते. परराष्ट्र कार्यालयाच्या माहितीनुसार, 'या हल्ल्याचा कट अफगाणिस्तानात वास्तव्यास असलेल्या दहशतवाद्यांनी रचला होता,' असे तपासात समोर आले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka