वनविभागाने केली सुटका, अधिवासात सोडणार
पवई तलावाच्या परिसरातील मोरारजी नगरमध्ये एक अजस्त्र मगर भरवस्तीत शिरल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. तलावाच्या जवळ असलेल्या एका दर्ग्यापाशी ही मगर दिसताच स्थानिकांची घाबरगुंडी उडाली.
घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
वनविभाग आणि बचाव पथकाने अत्यंत शिताफीने आणि संयमाने राबवलेल्या संयुक्त मोहिमेत या सुमारे सात फूट लांबीच्या मगरीला जेरबंद केले. या बचाव कार्यात मगरीला कोणतीही इजा झाली नसल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
सध्या मगरीची वैद्यकीय तपासणी केली जात असून, तिची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. मगरीला उपचारांनंतर पुन्हा तिच्या नैसर्गिक अधिवासात म्हणजेच पवई तलावात सुरक्षितपणे सोडण्यात येणार आहे.

