Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पुण्यात ९२ हजार कोटींची घरे विक्रीविना

पुण्यात ९२ हजार कोटींची घरे विक्रीविना

NEWS डंका 0 months ago

मागणीपेक्षा पुरवठा वाढल्याने रिअल इस्टेट बाजारात असमतोल

पुण्यातील निवासी रिअल इस्टेट बाजारात विक्रीला काही प्रमाणात गती मिळाल्याचे चित्र असले, तरी दुसरीकडे विक्रीविना पडून असलेल्या घरांच्या साठ्याने नवा उच्चांक गाठला आहे.

जून २०२६ अखेरच्या १२ महिन्यांच्या कालावधीत पुणे शहरात तब्बल ₹९२ हजार ११० कोटी किमतीची घरे विक्रीविना पडून असल्याची माहिती 'गेरा पुणे रेसिडेन्शियल रिअॅलिटी रिपोर्ट'मध्ये समोर आली आहे. मागणीपेक्षा नव्या प्रकल्पांचा पुरवठा अधिक वेगाने वाढत असल्याने हा साठा वाढल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे.

अहवालानुसार, गेल्या वर्षाच्या तुलनेत पुण्यात घरांच्या विक्रीत ७ टक्क्यांची वाढ होऊन ९२ हजार ३४१ घरांची विक्री झाली. मात्र, त्याच काळात बाजारात १ लाख १ हजार ८५ नव्या घरांची भर पडली, म्हणजेच नव्या प्रकल्पांची संख्या विक्रीच्या तुलनेत अधिक वेगाने वाढली. परिणामी विक्रीविना घरांचा साठा वाढत असून बाजारातील समतोल बिघडत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, पुण्यातील घरांच्या किमती वाढत असल्या तरी वाढीचा वेग मंदावला आहे. शहरातील सरासरी दर प्रति चौरस फूट ₹७,०८२ इतका झाला असून वार्षिक दरवाढ ४.८ टक्क्यांवर आली आहे. यापूर्वी ही वाढ ७.३ टक्के होती. वेतनवाढीचा वेग घरांच्या किमतींपेक्षा अधिक राहिल्यामुळे घर खरेदीची क्षमता काहीशी सुधारल्याचेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.

राहुल गांधी घातपात घडवू इच्छित होते…शिंदेंचा घणाघाती आरोप

खरेदीदारांच्या पसंतीतही लक्षणीय बदल दिसून येत आहे. लहान आणि परवडणाऱ्या घरांपेक्षा १,४०० चौरस फूटांपेक्षा मोठ्या घरांची मागणी वाढत असून, अपग्रेड होणारे ग्राहक बाजाराला चालना देत आहेत. उलट ६०० ते ८०० चौरस फूट क्षेत्रफळाच्या घरांच्या विक्रीत सातत्याने घट होत असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे.

रिअल इस्टेट क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, विक्रीत सुधारणा होत असली तरी पुरवठ्याचा वेग कायम राहिल्यास विकसकांवर आर्थिक ताण वाढू शकतो. मोठ्या प्रमाणातील न विकलेली घरे प्रकल्पांच्या रोख प्रवाहावर परिणाम करू शकतात आणि त्याचा फटका भविष्यात घरखरेदीदारांनाही बसू शकतो. त्यामुळे बाजारातील मागणी लक्षात घेऊन नव्या प्रकल्पांचे नियोजन करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka