Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
रेल्वे स्थानकावरील फ्री वाय-फाय अन् लाखो गायब!

रेल्वे स्थानकावरील फ्री वाय-फाय अन् लाखो गायब!

NEWS डंका 2 weeks ago

बँक ऑफ बडोदाच्या जीएमला ४ लाखांचा चुना

सार्वजनिक ठिकाणच्या फ्री वाय-फाय नेटवर्कचा वापर किती महागात पडू शकतो, याचे एक अत्यंत धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकावर फ्री वाय-फाय कनेक्ट करणे बँक ऑफ बडोदाच्या एका जनरल मॅनेजरच्या चांगलेच अंगलट आले आहे.

सायबर चोरांनी वाय-फायच्या माध्यमातून मोबाईल हॅक करून खोट्या आरटीओ चलनाची भुरळ घातली आणि थेट ४ लाख २७ हजार रुपयांची चुना लावला. याप्रकरणी एमआरए मार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल करून कसून तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वडाला येथील रहिवासी असलेले गोबिंदा बिस्वास (५६) हे फोर्ट येथील बँक ऑफ बडोदामध्ये जनरल मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत. १८ जुलै रोजी त्यांचे वैयक्तिक सचिव नारायण स्वामी स्टेशनवर होते. तिथे त्यांनी रेल्वेच्या मोफत वाय-फायसेवेचा वापर करण्यासाठी मोबाईल कनेक्ट केला. मात्र, हे वाय-फाय चोरांचे जाळे ठरले आणि फोन कनेक्ट होताच सायबर गुन्हेगारांनी सेक्रेटरीचा मोबाईल हॅक केला.

शेतकऱ्यांना कर्जमाफीच्या पहिल्याच टप्प्यात ₹५,०२८ कोटींचे वितरण

नाक खुपसू नका! 'एफसीआरए' भारताचा अंतर्गत विषय!!

हॅकिंगनंतर सेक्रेटरीच्या कॉन्टॅक्ट लिस्टधील सर्व नंबरवर 'RTO Challan APK' नावाच्या संशयास्पद फाईल्स ऑटोमॅटिक फॉरवर्ड होऊ लागल्या.
चलान समजून फाईल डाउनलोड करणे पडले भारी
हा मेसेज जेव्हा बँक मॅनेजर गोबिंदा बिस्वास यांच्याकडे पोहोचला, तेव्हा आरटीओचे अधिकृत चलान समजून त्यांनी कोणतीही शहानिशा न करता ती फाईल डाउनलोड केली. फाईल इन्स्टॉल होताच मॅनेजरचा फोनदेखील हॅक झाला आणि त्यांच्या संपर्कातील लोकांनाही तेच मेसेज पुन्हा फॉरवर्ड होऊ लागले. २१ जुलै रोजी मोबाईलमध्ये तांत्रिक बिघाड होत असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी ताबडतोब ती एपीके फाईल डिलीट केली. मात्र तोपर्यंत मोठे नुकसान झाले होते.
या सायबर फसवणुकीचा पर्दाफाश ३ ऑगस्ट रोजी झाला, जेव्हा मॅनेजरला त्यांच्या क्रेडिट कार्डचे मासिक बिल मिळाले. बिलाची तपासणी केली असता, २१ जुलै रोजी दुपारी अवघ्या २८ मिनिटांत पाच वेळा अनधिकृत व्यवहार करून एकूण ४,२७,२६४ रुपये परस्पर लाटल्याचे समोर आले.
असामान्य व्यवहार लक्षात आल्यावर क्रेडिट कार्ड विभागाने तातडीने कार्ड ब्लॉक केले होते. या प्रकरणी पीडित अधिकाऱ्याने राष्ट्रीय सायबर क्राईम पोर्टलवर तक्रार नोंदवल्यानंतर मुंबई पोलिसांच्या एमआरए मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता पोलीस त्या बनावट एपीके फाईल आणि वाय-फाय नेटवर्कच्या सुरक्षेतील त्रुटींचा कसून शोध घेत आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka