Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
रुपयाचा जोरदार कमबॅक! ₹९२.४१ प्रति डॉलरपर्यंत मजबुती

रुपयाचा जोरदार कमबॅक! ₹९२.४१ प्रति डॉलरपर्यंत मजबुती

NEWS डंका 1 month ago

RBI च्या कारवाईनंतर डॉलरसमोर स्थिती पलटली

डॉलरसमोर सतत कमजोर होत असलेल्या भारतीय रुपयाने अचानक दमदार पुनरागमन केले आहे. अलीकडे जागतिक तणाव, कच्च्या तेलाच्या वाढत्या किंमती आणि विदेशी गुंतवणुकीचा ओघ कमी झाल्यामुळे रुपया दबावाखाली होता.

मात्र, भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) घेतलेल्या कठोर निर्णयामुळे रुपयाने बाजारात जोरदार उडी घेत ₹९२.४१ प्रति डॉलर या पातळीपर्यंत मजबुती दाखवली, तर काही व्यवहारांमध्ये तो ₹९२.५९ पर्यंत स्थिर राहिला.

रुपयाच्या या अचानक मजबुतीमागे RBI ची थेट हस्तक्षेपात्मक भूमिका महत्त्वाची ठरली. विदेशी चलन बाजारात वाढलेल्या सट्टेबाजीमुळे रुपया सतत घसरत होता. हे रोखण्यासाठी RBI ने बँकांच्या दैनिक ओपन करन्सी पोझिशनवर $१०० मिलियन (सुमारे ₹८३० कोटी) मर्यादा घातली. या निर्णयामुळे बँका आणि ट्रेडर्सना मोठ्या प्रमाणात व्यवहार कमी करावे लागले. अंदाजानुसार जवळपास $३० अब्ज (सुमारे ₹२.५ लाख कोटी) इतके आर्बिट्राज व्यवहार अचानक बंद करण्यात आले. याशिवाय, RBI ने ऑफशोअर नॉन-डिलिव्हरेबल फॉरवर्ड (NDF) मार्केटमधील व्यवहारांवरही निर्बंध आणले. यामुळे रुपया घसरण्यावर पैज लावणाऱ्या गुंतवणूकदारांना मोठा फटका बसला आणि बाजारात डॉलरची मागणी कमी झाली. परिणामी रुपया मजबूत होण्यास मदत झाली.

टाटा कन्सल्टन्सीचे ६ लाख कर्मचारी खुशीत

मातीच्या घरातून ऑलिम्पिकपर्यंतचा प्रवास… लिलिमा मिंजची प्रेरणादायी कहाणी!

मात्र, या निर्णयाचा नकारात्मक परिणामही दिसून येत आहे. बँकांना जबरदस्तीने व्यवहार बंद करावे लागल्याने त्यांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. अंदाजानुसार या प्रक्रियेत बँकांना सुमारे ₹५,००० कोटींचा तोटा होऊ शकतो. काही बँकांना कोट्यवधी डॉलरचे नुकसान सहन करावे लागत आहे. त्याचबरोबर हेजिंगचा खर्चही मोठ्या प्रमाणात वाढला असून तो मागील अनेक वर्षांतील उच्चांकावर पोहोचला आहे. RBI च्या या अचानक कारवाईमुळे विदेशी गुंतवणूकदारांमध्येही चिंता वाढली आहे. धोरणातील अनिश्चिततेमुळे काही गुंतवणूकदारांनी भारतीय बाँड मार्केटमधून सुमारे $१ अब्ज (सुमारे ₹८,३०० कोटी) गुंतवणूक काढून घेतली आहे. तज्ञांच्या मते, अशा प्रकारच्या हस्तक्षेपामुळे भारताच्या मुक्त आणि पारदर्शक बाजारपेठेच्या प्रतिमेवर परिणाम होऊ शकतो.

दरम्यान, रुपया मजबूत झाला असला तरी ही स्थिती कायम राहील का, याबाबत अजूनही अनिश्चितता आहे. भारत मोठ्या प्रमाणात कच्चे तेल आयात करतो, त्यामुळे तेलाच्या किंमती वाढल्यास पुन्हा रुपयावर दबाव येऊ शकतो. RBI ने स्पष्ट केले आहे की हे उपाय तात्पुरते आहेत आणि परिस्थितीनुसार बदल केले जाऊ शकतात. एकूणच, RBI च्या आक्रमक निर्णयामुळे रुपयाने डॉलरसमोर जोरदार कमबॅक केले असले, तरी त्याची किंमत बँका, गुंतवणूकदार आणि बाजाराला मोजावी लागत आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka