Dailyhunt
सापळा आहे, ठाऊक होते तरी ट्रम्प चालत आत गेले

सापळा आहे, ठाऊक होते तरी ट्रम्प चालत आत गेले

NEWS डंका 1 month ago

मेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पूर्णपणे एकाकी पडलेले दिसतात. ना नाटोचे सदस्य देश सोबत. देशात विरोधी बाकांवर बसलेले डेमॉक्रॅट्स तर पिसं काढत होतेच, आता त्यांच्या समर्थकांनी, लष्कराच्या अधिकाऱ्यांनाही ट्रम्प यांच्या विरोधात आघाडी उघडलेली दिसते.

'नॅशनल काऊंटर टेररीझम सेंटर'चे डायरेक्टर जो केंट यांनी पदाचा राजीनामा दिलेला असून ट्रम्प यांच्यासाठी हा फार मोठा धक्का मानला जातो आहे. 'मेक अमेरिका ग्रेट अगेन', 'अमेरिका फर्स्ट' आदी धोरणांमुळे ट्रम्प यांचे कट्टर समर्थक बनलेल्या जो केंट यांनी ट्रम्प यांच्या इराण धोरणाची लक्तरे काढली आहे. काँग्रेसचे अनेक सदस्य त्यांचे समर्थन करताना दिसत आहेत. अमेरिकेत वाऱ्याची दिशा बदलते आहे, ते सध्या ट्रम्प यांच्या विरोधात वाहताना दिसत आहेत.

ट्रम्प यांनी इराणवर हल्ला तर केला, परंतु त्यांच्याकडे यशस्वी माघारीची योजना दिसत नाही, अशी टीका सामरीक तज्ज्ञांकडून केली जाते आहे. युद्ध सुरू करताना ट्रम्प यांच्याकडे कोणताही रोडमॅप नव्हता. युद्धाची उद्दीष्टेही स्पष्ट नव्हती. उद्दीष्टांबाबत त्यांचे सतत घुमजाव सुरू आहे. असा या टीकेचा रोख आहे. म्हणजे ट्रम्प कशासाठी युद्ध करतायत हे त्यांना ठाऊक नव्हते, असे मत तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे. एकूणच इराण युद्ध ट्रम्प यांना जड जाताना दिसत आहे.

'इराणने अण्वस्त्रे सज्ज करत आणली आहेत. इराणच्या क्षेपणास्त्रांचा अमेरिकेला थेट धोका आहे', असे कारण देऊन ट्रम्प यांनी इराणवर हल्ला केला. अमेरिकी गुप्तचर यंत्रणेला खरे तर हा दावा कधीच मान्य नव्हता. आता ट्रम्प यांचा समर्थक जो केंट याने पुन्हा एकदा ट्रम्प यांच्या दाव्याच्या चिंधड्या उडवल्या आहेत. 'इराणचा अमेरिकेला कोणताही तात्काळ धोका संभवत नव्हता. इराणवर अमेरिकेने केलेला हल्ला केवळ अमेरिकेतील काही गट आणि इस्त्रायलच्या दबावामुळे झालेला आहे', असा ठपका ठेवत त्यांनी नॅशनल काऊंटर टेरेरीझम सेंटरच्या डायरेक्टर पदाचा राजीनामा दिलेला आहे.

केंट हे अमेरिकेच्या गुप्तचर विभागाच्या प्रमुख तुलसी गबार्ड यांचा अत्यंत विश्वासू अधिकारी मानले जातात. ते स्पेशल फोर्समध्ये कार्यरत होते. काऊंटर टेररीझम, इंटेलिजन्सच्या क्षेत्रातही त्यांनी चांगले काम केले. पुढे रिपब्लिकन पक्षात सहभागी होऊन त्यांनी निवडणूक लढवली. ट्रम्प यांनी त्यांना काऊंटर टेररीझम सेंटरचे डायरेक्टर म्हणून नियुक्त केले.

योगायोग म्हणजे कधी काळी तुलसी गबार्ड त्यांचाही ट्रम्प यांच्या धोरणांना कठोर विरोध होता. इराणवर हल्ला करण्यात आल्यानंतर गबार्ड यांनी गूढ मौन धारण केलेले आहे. गेल्या काही दिवसात त्यांचे एकही विधान आलेले नाही. 'देशाला तातडीने धोका आहे की नाही हे ठरवण्याची जबाबदारी राष्ट्राध्यक्ष म्हणून ट्रम्प यांच्यावर आहे. गुप्तचर विभागाचे काम त्यांच्यासमोर सर्वप्रकारची गोपनीय ठेवण्याचे आहे. या माहितीच्या आधारे त्यांनी इराणवर हल्ला करण्याचा निर्णय घेतला.'

गबार्ड यांचे विधान ऐकल्यानंतर लक्षात येते की त्यांनी ना केंट यांचे नाव घेतले, ना ट्रम्प यांच्या भूमिकेचे समर्थन केले. त्यांचे विधान अत्यंत सपाट अशा प्रकारचे आहे. ट्रम्प यांच्या भूमिकेबाबत गबार्ड बोलणे टाळतायत.

इतिहासाच्या उंबरठ्यावर किंग कोहली

केदारनाथ दर्शन; सारा अली खानला द्यावे लागेल 'सनातनी' प्रमाणपत्र

यातली गोम अशी आहे, २०१९ मध्ये तुलसी गबार्ड या डेमोक्रॅट्स पक्षात होत्या. त्यावेळी त्यांनी केंट यांच्यासारखीच भूमिका घेत ट्रम्प यांच्यावर कठोर टीका केली होती. 'परराष्ट्र धोरणाच्या प्रांतात दूरदूष्टीचा अभाव आपल्याला इराण युद्धाच्या दिशेने नेतो आहे. ज्यामुळे इराणला त्यांचा आण्विक कार्यक्रम अधिक वेगाने रेटण्याची संधी मिळणार आहे. हे सगळे नेतान्याहू आणि सौदीला खूष कऱण्यासाठी सुरू आहे. यात 'अमेरिका फर्स्ट' कुठेही दिसत नाही. इराण युद्धासमोर कदाचित इराक युद्ध किरकोळ वाटू शकेल असे त्या म्हणाल्या होत्या.' याचा अर्थ सात वर्षांपूर्वी गबार्ड यांनी घेतलेली भूमिका आज केंट घेताना दिसत आहेत. ट्रम्प यांच्या दृष्टीने हा धोक्याचा लाल दिवा आहे.

ट्रम्प यांच्या 'मेक अमेरिका ग्रेट अगेन' या घोषणेची भुरळ पडलेल्या अमेरिकन्स पैकी केंट हे एक होते. त्यांना काऊंटर टेररीझम सेंटरचे डायरेक्टर म्हणून जबाबदारी देताना 'अमेरिका सुरक्षित ठेवण्यासाठी आमची मदत करा', असे विधान ट्रम्प यांनी केले होते. त्याच केंट यांनी 'ट्रम्प इस्त्रायल आणि अमेरिकेतील एका शक्तीशाली लॉबीच्या दबावाखाली आहेत. उच्च पदस्थ इस्त्रायली अधिकारी आणि मीडियातील काही बड्यांच्या दबावाखाली ट्रम्प यांनी इराणविरुद्ध युद्ध छेडण्याचा निर्णय घेतला आहे.' असा ठपका ठेवत ट्रम्प यांच्यावर टीका केली आहे.

जे २०१९ मध्ये गबार्ड म्हणाल्या होत्या आणि २०२६ मध्ये केंट म्हणतायत ते अगदी सारखेच आहे. यात आश्चर्याची बाब एवढीच आहे की, आज इराणवर हल्ला करणाऱ्या ट्रम्प यांचेही मत त्यांच्यापेक्षा वेगळे नव्हते.

दुसऱ्या टर्ममध्ये अफगाणिस्तान, इराक युद्धात पाय अडकवून अमेरिकेने मोठी चूक केलेली आहे, ही भूमिका ट्रम्प यांनी अनेकदा घेतली. Iraq war was a big, fat mistake हे त्यांचे विधान होते. We are bringing our soldiers back home. We are ending the endless wars हीच त्यांची अफगाण युद्धाच्या काळातील भूमिका होती.

ट्रम्प यांच्या या भूमिकेमागे अमेरिकेच्या डळमळीत झालेल्या अर्थकारण होते. युद्धाची चैन अमेरिकेला परवडणार नाही, हे त्यांना ठाऊक होते. एन्डलेस वॉर म्हणजे पैसा बर्बाद, अर्थकारणाचे तीन तेरा. लांबलेली युद्ध अमेरिकेला परवडणार नाही, हे माहित असूनही ट्रम्प त्याच सापळ्यात अडकलेले आहेत. होर्मुज बंद झाल्यामुळे केवळ जगाच्या अर्थकारणावरच नाही, तर अमेरिकेच्या अर्थकारणावर परिणाम होतो आहे. युद्धाच्या काळात अमेरिका एकाकी पडल्याचे चित्र आहे. ट्रम्प यांनी नाटो देशांकडे जाहीरपणे मदत मागितली. नाटो देशांना जाहीरपणे त्यांना नकार कळवला. नकार विनम्र नव्हता, विखारी होता. ट्रम्प यांच्या जखमेवर मीठ चोळणारा होता. चीनकडे मदत मागण्याची वेळ ट्रम्प यांच्यावर आली. चीन मदत करतो आहे, परंतु इराणची.

अमेरिकेवर हीच वेळ इराणला आणायची होती. ट्रम्प या सापळ्यात चालत गेलेले आहे. हे युद्ध संपवण्यासाठी त्यांच्यावर दबाव येतो आहे. हे परवडणारे युद्ध नाही हे त्यांनाही ठाऊक आहे. युद्धाचा प्रत्यक्ष खर्च रोज सुमारे १ ते ५ अब्ज डॉलर्सच्या दरम्यान आहे. यापूर्वी इराक आणि अफगाणिस्तान युद्धात अमेरिकेने प्रत्येकी २-२ ट्रिलियन डॉलर्स फुंकले आहेत. हे युद्ध कधी संपेल हे आम्ही ठरवू असे आयआरजीसीने अत्यंत नि:संदिग्ध शब्दात स्पष्ट केले आहे.

म्हणजे युद्धक्षेत्रात ट्रम्प यांची कोंडी झालेली आहे, आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या क्षेत्रात त्यांच्याच मित्र देशांनी त्यांच्याकडे पाठ फिरवली आहे. आता देशांतर्गत राजकारणात त्यांच्याच विश्वासू नेत्यांनी बंडाचा झेंडा फडकावलेला आहे. केंट हे काही फार मोठी राजकारणी नव्हेत. ते महत्वाच्या पदावर होते, परंतु ते फार मोठे पद नाही. केंट हे राष्ट्रीय सुरक्षेच्या मामल्यात अत्यंत कच्चे आहेत, अशी प्रतिक्रीया ट्रम्प यांची केट यांच्या राजीनाम्यानंतर दिलेली आहे. केंट यांना काही काँग्रेस सदस्यांचे समर्थन मिळाले आहे. परंतु त्यामुळे ट्रम्प सरकारच्या स्थिरतेवर काही फरक पडणार नाही. येत्या काळात आखातातील युद्ध चिघळले तर असे आणखी काही राजीनामे येण्याची शक्यता आहे. अमेरिकेत यंदाच्या वर्षी नोव्हेंबरमध्ये मध्यावधी निवडणुका आहेत. इराण युद्धात ट्रम्प यांचे तोंड काळे झाले तर येत्या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाची दैना उडणार ही बाब निश्चित आहे.

राष्ट्राध्यक्ष पदावर विराजमान झाल्यापासून ट्रम्प अहम् ब्रह्मास्मीच्या थाटात वावरतायत. राष्ट्रप्रमुखांचा अपमान करतायत, त्यांच्याबद्दल फाजील विधाने करतायत. कॅनडासारख्या संपन्न देशाला अमेरिकेचे ५१ वे राज्य म्हणून हिणवण्याचा पराक्रम त्यांनी केला. आता व्हेनेझुएला बद्दल सुद्धा ट्रम्प तेच म्हणतायत. ज्यांना ज्यांना ट्रम्प यांनी वर्षभराच्या काळात दुखावले ती सगळी मंडळी आता सापळ्यात अडकलेल्या ट्रम्प यांची मजा बघतायत. ट्रम्प यांनी त्यांना जे ऐकवले होते, त्याचे उट्टे काढतायत. कालाय तस्मै नम:, समय बडा बलवान एवढाच याचा अर्थ आहे.

(न्यूज डंकाचे संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka