महिला आशिया कप २०२६च्या उपांत्य फेरीपूर्वी भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरने संघाला महत्त्वाचा सल्ला दिला आहे. लीग स्टेजमध्ये मिळवलेली विजयी लय कायम ठेवण्यावर आता भारताचा भर असणार आहे.
पुढचे दोन सामने अत्यंत महत्त्वाचे असून, एका वेळी एका सामन्यावर लक्ष केंद्रित करण्याची गरज असल्याचे हरमनप्रीतने स्पष्ट केले.
बीसीसीआयने सोमवारी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये हरमनप्रीत म्हणाली, 'पुढचे दोन सामने आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. एका वेळी एका सामन्यावर लक्ष द्यायचे आहे. पुढचा सामना खूप महत्त्वाचा आहे. आतापर्यंत ज्या पद्धतीने आम्ही चांगली कामगिरी केली आहे, तीच कामगिरी पुढेही कायम ठेवण्याचा प्रयत्न करू.'
नॉकआउट सामन्यांमध्ये दबाव वाढतो. मात्र, अशा परिस्थितीत खेळाडूंनी स्वतःवर आणि आपल्या योजनांवर विश्वास ठेवणे गरजेचे असल्याचे कर्णधाराने सांगितले.
'आता लय खूप महत्त्वाची आहे. स्वतःवर विश्वास ठेवा, आपल्या योजनांवर विश्वास ठेवा आणि लीग स्टेजमध्ये ज्या पद्धतीने फलंदाजी आणि गोलंदाजी केली, त्याच पद्धतीने खेळा,' असे हरमनप्रीतने म्हटले.
भारताच्या स्पर्धेतील कामगिरीत फलंदाजीसोबतच गोलंदाजांचाही मोठा वाटा राहिला आहे. शेफाली वर्माची आक्रमक फलंदाजी आणि स्मृती मंधानाचे शतक यांचा उल्लेख करत हरमनप्रीतने दोघींचे कौतुक केले.
'पहिल्या सामन्यात शेफाली ज्या पद्धतीने फलंदाजी करत होती, चेंडूवर आक्रमण करत होती, ते पाहणे शानदार होते. दुसऱ्या सामन्यात स्मृतीचे शतकही अप्रतिम होते. आमच्या गोलंदाजांनीही आव्हान स्वीकारले आहे. त्यांना फक्त आपल्या योजनांवर विश्वास ठेवून योग्य वेळी त्यांची अंमलबजावणी करायची आहे,' असे ती म्हणाली.
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात हरमनप्रीतने १५० टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांत नेतृत्व करणारी पहिली क्रिकेटपटू होण्याचा विक्रम केला. या ऐतिहासिक टप्प्याबद्दल बोलताना तिने आपल्या यशाचे श्रेय संघातील सहकारी, बीसीसीआय, सपोर्ट स्टाफ आणि कुटुंबीयांना दिले.
'मी इतक्या पुढे पोहोचेन, असा कधीच विचार केला नव्हता. माझ्या संघातील सहकारी, बीसीसीआय, सपोर्ट स्टाफ आणि माझे कुटुंबीय माझी सर्वात मोठी ताकद राहिले आहेत,' असे हरमनप्रीत म्हणाली.
आता लीग स्टेज संपले असून भारतासमोर उपांत्य फेरीचे आव्हान आहे. त्यानंतर अंतिम सामन्याची लढत असेल. त्यामुळे आतापर्यंतची विजयी लय कायम ठेवत मैदानात उतरणे, हेच टीम इंडियासमोरचे सर्वात मोठे लक्ष्य असणार आहे.

