Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
शेअर बाजारात हाहाकार! सेन्सेक्स-निफ्टीची मोठी घसरण

शेअर बाजारात हाहाकार! सेन्सेक्स-निफ्टीची मोठी घसरण

सेन्सेक्स १,४५६ अंकांनी कोसळला, निफ्टी २३,४०० खाली

देशांतर्गत शेअर बाजारात मंगळवारी मोठी घसरण पाहायला मिळाली. जागतिक तणाव, कच्च्या तेलाच्या वाढलेल्या किंमती, डॉलरच्या तुलनेत रुपयाची विक्रमी घसरण आणि परदेशी गुंतवणूकदारांकडून सुरू असलेली विक्री यामुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

परिणामी बीएसई सेन्सेक्स तब्बल १,४५६ अंकांनी घसरून ७४,५५९ वर बंद झाला, तर एनएसई निफ्टी ४३६ अंकांनी कोसळत २३,३७९ वर स्थिरावला. सलग चौथ्या सत्रात बाजारात घसरण नोंदवली गेली.

दिवसभरात सेन्सेक्सने १,५६६ अंकांची घसरण अनुभवली होती, तर निफ्टी २३,३४८ या नीचांकी पातळीपर्यंत घसरला. बाजारातील या मोठ्या पडझडीमुळे गुंतवणूकदारांचे सुमारे १० ते ११ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. मिडकॅप आणि स्मॉलकॅप समभागांमध्येही जोरदार विक्री झाली.

या घसरणीमागील सर्वात मोठे कारण म्हणजे मध्यपूर्वेतील वाढता तणाव. अमेरिका आणि इराण यांच्यातील चर्चेत अनिश्चितता कायम असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारात ब्रेंट क्रूडचा दर १०७ डॉलर प्रति बॅरलच्या वर गेला. भारत मोठ्या प्रमाणात तेल आयात करत असल्याने वाढत्या तेलदरांचा थेट परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवर आणि बाजारावर होत असल्याची भीती गुंतवणूकदारांना वाटू लागली.

इंदिरा गांधींच्या बातमीचा तो फोटो बनावट, पण बातमी खरी!

राष्ट्रीय महिला आयोगाच्या अहवालात टीसीएस प्रकरणातील धक्कादायक माहिती

पाकिस्तानची डबल ढोलकी, इराणला हवाई तळ दिला!

याशिवाय रुपयाने डॉलरच्या तुलनेत ऐतिहासिक नीचांकी स्तर गाठला. डॉलरच्या तुलनेत रुपया ९५.६३ पर्यंत घसरल्याने परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून पैसे काढण्याचा वेग वाढवला. विदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी यावर्षी आतापर्यंत दोन लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेची विक्री केल्याचे वृत्त आहे.

माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील समभागांमध्ये सर्वाधिक घसरण झाली. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि इन्फोसिस या दिग्गज कंपन्यांचे शेअर्स ३ टक्क्यांहून अधिक घसरले. एचसीएल टेक, विप्रो आणि इतर आयटी कंपन्यांनाही मोठा फटका बसला. कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील झपाट्याने होत असलेल्या बदलांमुळे पारंपरिक आयटी सेवा कंपन्यांच्या व्यवसायावर दबाव वाढेल, अशी भीती गुंतवणूकदारांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे निफ्टी आयटी निर्देशांकात सुमारे ४ टक्क्यांची घसरण झाली.

बँकिंग, वित्तीय सेवा, रिअल्टी आणि ग्राहक वस्तू क्षेत्रातील समभागांमध्येही मोठी विक्री झाली. मात्र, तेल आणि वायू क्षेत्रातील काही समभागांनी तुलनेने चांगली कामगिरी केली. ओएनजीसीसारख्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ दिसून आली.

तज्ज्ञांच्या मते, जागतिक पातळीवरील अनिश्चितता आणि वाढलेली अस्थिरता यामुळे पुढील काही दिवस बाजारात दबाव कायम राहू शकतो. भारताचा अस्थिरता निर्देशांक 'इंडिया व्हिक्स'मध्येही वाढ झाली असून गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, बाजारातील या मोठ्या घसरणीनंतर किरकोळ गुंतवणूकदारांनी घाबरून निर्णय न घेता दीर्घकालीन दृष्टीकोन ठेवण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. जागतिक घडामोडींवर आणि तेलाच्या किंमतींवर पुढील काही दिवस बाजाराची दिशा अवलंबून राहणार असल्याचे मानले जात आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka