Dailyhunt
श्रीलंका किनाऱ्याजवळ इराणी जहाजावर पाणबुडीचा हल्ला

श्रीलंका किनाऱ्याजवळ इराणी जहाजावर पाणबुडीचा हल्ला

NEWS डंका 1 month ago

१०१ जण बेपत्ता, ७८ जखमी

श्रीलंकेच्या दक्षिण किनाऱ्याजवळ इराणच्या नौदलाच्या जहाजावर झालेल्या संशयित पाणबुडी हल्ल्यामुळे मोठी सागरी दुर्घटना घडली आहे. या घटनेत किमान १०१ नौसैनिक बेपत्ता झाले असून ७८ जण जखमी झाले आहेत.

जखमींना श्रीलंकेतील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, इराणच्या नौदलातील 'IRIS डेना' या युद्धनौकेने बुधवारी पहाटे श्रीलंकेच्या दक्षिणेकडील गाले (Galle) किनाऱ्याजवळून आपत्कालीन संदेश पाठवला. या संदेशानंतर श्रीलंका नौदल आणि हवाई दलाने तात्काळ बचाव मोहीम सुरू केली. या जहाजावर सुमारे १८० नौसैनिक असल्याची माहिती श्रीलंकेच्या परराष्ट्र मंत्र्यांनी दिली आहे.

प्राथमिक अहवालानुसार, अज्ञात पाणबुडीने या जहाजावर हल्ला केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. हल्ल्यानंतर जहाजाला गंभीर नुकसान झाले आणि काही वेळातच ते समुद्रात बुडाले, असे लष्करी सूत्रांनी सांगितले. या दुर्घटनेनंतर समुद्रात मोठ्या प्रमाणावर शोध आणि बचाव मोहीम सुरू करण्यात आली आहे.

उपांत्य फेरीपूर्वी भारतीय क्रिकेटपटू श्री सिद्धीविनायक चरणी

मुंबई शेअर बाजार १,५०० अंकांनी गडगडला

गोल्ड-सिल्व्हर ETF मध्ये तब्बल ७ टक्क्यांपर्यंत घसरण

श्रीलंकेच्या नौदलाने आतापर्यंत किमान ७९ जणांना समुद्रातून वाचवले असल्याची माहिती समोर आली आहे. बचावलेल्या अनेक नौसैनिकांना गंभीर दुखापती झाल्या असून काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जाते. गाले येथील प्रमुख रुग्णालयात जखमींवर उपचार सुरू आहेत. एका जखमीचा मृत्यू झाल्याचीही माहिती समोर आली आहे.

घटनेनंतर श्रीलंका सरकारने सागरी सुरक्षा वाढवली असून घटनास्थळी नौदलाची अतिरिक्त जहाजे आणि विमाने तैनात करण्यात आली आहेत. या घटनेमागे नेमके कोण आहे, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तपास सुरू असून आंतरराष्ट्रीय स्तरावरही या घटनेबाबत मोठी चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, मध्यपूर्वेत वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडल्यामुळे परिस्थिती अधिक संवेदनशील झाली आहे. अलीकडेच अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष तीव्र झाला असून त्याचे परिणाम आता आंतरराष्ट्रीय समुद्री मार्गांवरही दिसू लागले आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka