Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
सिंकफील्ड कपमध्ये प्रज्ञानानंदचा 'चेकमेट'! सिंडारोववर दमदार विजय

सिंकफील्ड कपमध्ये प्रज्ञानानंदचा 'चेकमेट'! सिंडारोववर दमदार विजय

भारतीय बुद्धिबळाचा युवा स्टार आर. प्रज्ञानानंदने सिंकफील्ड कप २०२६ मध्ये दणक्यात खाते उघडले आहे. वर्ल्ड चॅम्पियनशिपचा चॅलेंजर जावोखिर सिंडारोव याच्यावर तब्बल ९५ चालींच्या मॅरेथॉन लढतीत विजय मिळवत प्रज्ञानानंदने स्पर्धेतील आपली पहिली बाजी मारली.

पहिल्या फेरीत अमेरिकेच्या सॅम सेवियनविरुद्ध ड्रॉ खेळल्यानंतर प्रज्ञानानंदने दुसऱ्या फेरीत सिंडारोवला चांगलाच घाम फोडला. तब्बल सहा तास चाललेल्या सामन्यात प्रज्ञानानंदने रुक-नाइट एंडगेममध्ये संयम राखत प्रतिस्पर्ध्यावर दबाव कायम ठेवला.

सामन्यातील ८२व्या चालीवर सिंडारोवकडून झालेली चूक प्रज्ञानानंदच्या पथ्यावर पडली. त्याने क्षणाचाही विलंब न करता आघाडी मजबूत केली आणि अखेर ९५व्या चालीवर विजयावर शिक्कामोर्तब केले.

या विजयामुळे प्रज्ञानानंदच्या खात्यात आता १.५ गुण जमा झाले असून, तो आणखी चार खेळाडूंसह गुणतालिकेत आघाडीच्या गटात दाखल झाला आहे. त्यामुळे सिंकफील्ड कपच्या विजेतेपदाच्या शर्यतीत त्याचे नाव आता ठळकपणे पुढे आले आहे.

स्पर्धेत इतर महत्त्वाच्या सामन्यांमध्ये लेव्हॉन अरोनियनने विन्सेंट कीमरचा, एमव्हीएलने सॅम सेवियनचा, तर वेस्ली सोने जॉर्डन व्हॅन फॉरेस्टचा पराभव केला.

प्रज्ञानानंदचा पुढील सामना तिसऱ्या फेरीत विन्सेंट कीमरविरुद्ध होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार बुधवारी रात्री १०.३० वाजता सुरू होईल. दोन फेऱ्यांनंतर तब्बल पाच खेळाडू १.५ गुणांसह संयुक्त आघाडीवर आहेत. त्यामुळे पुढील फेऱ्यांमध्ये विजेतेपदाची लढत आणखी रंगणार आहे.

याआधी २०२६ सेंट लुईस रॅपिड अँड ब्लिट्झ स्पर्धेतही प्रज्ञानानंदने आपला ठसा उमटवला. रॅपिडमध्ये १८ पैकी १२ गुण मिळवत त्याने अव्वल स्थान पटकावले आणि ब्लिट्झचे विजेतेपदही आपल्या नावावर केले. या दमदार कामगिरीमुळे तो कारकिर्दीत प्रथमच जागतिक रॅपिड क्रमवारीच्या लाइव्ह टॉप-१०मध्ये पोहोचला.

सिंकफील्ड कप २०२६ हा ग्रँड चेस टूरच्या नियमित हंगामातील अखेरचा आणि प्रतिष्ठेचा क्लासिकल इव्हेंट आहे. ही स्पर्धा १९ ऑगस्टपर्यंत रंगणार असून, प्रज्ञानानंदच्या पुढील चालींकडे आता बुद्धिबळविश्वाचे लक्ष लागले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka