Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
तारीक रेहमान करतायत चीन-पाकिस्तानसोबत गुटर्गू?

तारीक रेहमान करतायत चीन-पाकिस्तानसोबत गुटर्गू?

NEWS डंका 2 weeks ago

भाजपाने पश्चिम बंगालमध्ये विजय मिळवल्यानंतर बांगलादेशात खळबळ उडाली आहे. अचानक या देशाचे नेते भारताला दम देऊ लागले आहेत. ते एक तर भारतविरोधी विधाने तरी करत आहेत किंवा कारवाया तरी.

बांगलादेशचा एक हात चीनच्या गळ्यात आणि दुसरा पाकिस्तानच्या गळ्यात पडलेला आहे. गेल्या १५ वर्षांमध्ये प्रथमच भारत आणि बांगलादेशात गुप्तचर माहितीच्या देवाणघेवाणीबाबत करार झालेला आहे. तिस्ता प्रकरणी चीनने आम्हाला मदत करावी, अशी विनंती बांगलादेशने चीनला केलेली आहे. हे सगळे रागरंग पाहता औकात असो वा नसो, बांगलादेशने भारताशी भिडण्याची मानसिकता बनवली आहे, हे निर्विवाद.

सुमारे दीड वर्षे बांगलादेशमध्ये मोहम्मद युनूस यांची अत्यंत आततायी राजवट होती. या काळात ईशान्य भारत तोडण्याची भाषा केली जात होती. याच काळात बांगलादेशात हिंदूंचे मोठ्या प्रमाणात शिरकाण झाले. सर्व प्रकारचे अत्याचार हिंदूंवर झाले. बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीची (BNP) सत्ता आल्यानंतर हिंसाचाराच्या घटना कमी झाल्या, परंतु हिंदूविरोध मात्र धुमसत होता. पश्चिम बंगालमध्ये भाजपाची सत्ता आल्यानंतर अचानक बांगलादेश सरकार अस्वस्थ झालेले आहे. तारिक रहमान यांच्या सरकारने लगेचच पाकिस्तान आणि चीनशी संबंध घट्ट करण्याच्या दृष्टीने पावले टाकली आहेत.

बांगलादेशचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार खलीलुर रहमान चीन भेटीवर गेले होते. तिथे त्यांनी भारतात उगम पावणाऱ्या तिस्ता नदीबाबत गंभीर आणि आक्षेपार्ह विधाने केली. तिस्ता प्रकल्पासाठी चीनकडून आम्ही आर्थिक आणि तांत्रिक सहकार्याची मागणी करतो, असे ते म्हणाले आहेत. २०२४ मध्ये भारताने तिस्ता खोऱ्याच्या विकासासाठी तांत्रिक मदतीचा प्रस्ताव दिला होता. परंतु या प्रस्तावाला बांगलादेशने वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. हा प्रकल्प सिलिगुडी कॉरिडॉरच्या जवळ असल्यामुळे इथे चीनची लुडबुड भारताला नको आहे. परंतु बांगलादेश आपल्या विकासाचे मार्ग निवडण्यासाठी मोकळा आहे, आम्ही आमच्या राष्ट्रहिताला प्राधान्य देऊ, अशी आडमुठी भूमिका रहमान यांनी घेतली आहे. चीन हा बांगलादेशचा सगळ्यात मोठा विकास भागीदार आहे, असे सांगत ते भारताच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करत आहेत.

रशिया- युक्रेन यांच्यात १,००० कैद्यांची होणार अदलाबदल

सोमनाथ मंदिरात वैदिक मंत्र, भजन आणि पहिल्यांदाच झाला कुंभाभिषेक

कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती; सेन्सेक्स ९०० हून अधिक अंकांनी घसरला

आयफोन 18 प्रो मॅक्स येतोय! काय असतील वैशिष्ट्ये?

बांगलादेशच्या आडमुठेपणाच्या मागे तीन महत्वाची कारणे आहेत. एक तर गंगा पाणीवाटप करार डिसेंबर २०२६ मध्ये संपुष्टात येणार आहे. सिंधू जलवाटप कराराबाबत भारताने ज्या प्रकारची भूमिका घेतली आहे, ती पाहता बांगलादेशचे धाबे दणाणले आहेत. सध्याचा गंगा पाणीवाटप करार भारताच्या दृष्टीने सोयीचा नाही. त्यामुळे पूर्वीचा करार जसाच्या तसा स्वीकारला जाईल, याची शक्यता कमी आहे. तिस्ता आणि गंगा या दोन नद्यांवर बांगलादेश जगत आहे. भारताने इथे काही गेम केला, तर आज पाण्याविना पाकिस्तानची जी अवस्था झालेली आहे, तसाच प्रकार बांगलादेशसोबत होऊ शकतो.

पश्चिम बंगालमध्ये भाजपाचे सरकार येणे हेही बांगलादेशला जबरदस्त झोंबले आहे. ममता बॅनर्जी यांचे सरकार पश्चिम बंगालमध्ये राहणे हे बांगलादेशच्या पथ्यावर पडणारे होते. आज तिथे ३५ ते ४० टक्के लोकसंख्या मुस्लिम आहे. त्यात मोठे प्रमाण १९७१ पासून तिथे घुसलेल्या बांगलादेशींचे आहे. बरीच मंडळी देशाचे नागरिक बनली आहेत. ब्रिटीशांच्या काळात बंगालची फाळणी झाली होती. पूर्व बंगाल मुस्लिमांचा आणि पश्चिम बंगाल हिंदूंचा अशी विभागणी झाली होती. बांगलादेशातील हिंदूंचे एका बाजूला मोठ्या प्रमाणात शिरकाण सुरू आहे, तर दुसऱ्या बाजूला पश्चिम बंगालमध्ये मुस्लिमांची लोकसंख्या फुगत चालली आहे. आणखी पाच वर्षे ममता राहिल्या असत्या, तर पश्चिम बंगालमध्ये मुस्लिमांचा टक्का आणखी किमान पाचने वाढला असता. ग्रेटर बांगलादेशचा मार्ग मोकळा झाला असता. ममता बॅनर्जी यांनी गेली १५ वर्षे मुस्लिमांना मुक्तद्वार दिले होते. भारत-बांगलादेश सीमेवर फेन्सिंग करण्यासाठी ममतांचाच सगळ्यात मोठा अडसर होता; त्या फेन्सिंगसाठी जमीन अधिग्रहित करत नव्हत्या.

पश्चिम बंगालमध्ये झालेला तख्तापलट बांगलादेशच्या सोयीचा नाही, कारण आता बांगलादेशींना हाकलण्याचा कार्यक्रम जोरात सुरू होईल. मोठ्या संख्येने बांगलादेशी आधीच पश्चिम बंगालमधून पळ काढत आहेत. सरकार जेव्हा 'बांगलादेशी हटाओ' ही मोहीम हाती घेईल, तेव्हा कहर होणार आहे. याच मुद्द्यावरून भारताचा बांगलादेशसोबत पंगा होणार आहे. आपल्या देशातून भारतात शिरलेले घुसखोर पुन्हा परतू नयेत, म्हणून बांगलादेशने सीमेवर मोठ्या संख्येने बांगलादेश रेंजर तैनात केले आहेत.

काही दिवसांपूर्वी आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा सातत्याने घुसखोरांच्या विरोधात बोलत आहेत. बांगलादेशींना लाथ मारून हाकलण्याची भाषा करतायत. आसाममध्ये एनआरसीनंतर १९ लाख घुसखोर असल्याचे उघड झाले आहे. बांगलादेश सरकार यांना घ्यायला तयार नसते, म्हणून रात्रीच्या अंधारात आम्ही त्यांना बांगलादेशात ढकलतो, असे त्यांनी एका मुलाखतीत सांगितल्यानंतर बांगलादेशातील भारताचे हंगामी उच्चायुक्त पवन बाधे यांना पाचारण केले गेले. शर्मा यांचे विधान अपमानास्पद असून यामुळे दोन्ही देशांचे संबंध बिघडतील, असा इशारा दिला गेला. भारताने त्यांच्या देशातील बंगाली भाषक 'मुस्लिमांना बांगलादेशात लोटू नये, अन्यथा आम्ही आवश्यक कारवाई करू', असा इशारा बांगलादेशचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार खलीलुर रहमान यांनी दिलेला आहे.

सर्मा जे म्हणत आहेत ते सत्य आहे. भारत आणि बांगलादेशचे संबंध सुधारले तरी रहमान यांचे सरकार बऱ्या बोलाने त्यांच्या नागरिकांना स्वीकारेल, याची शक्यता शून्य आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी अलीकडेच एका पत्रकार परिषदेत बांगलादेशी घुसखोरांना हस्तांतरित करण्याच्या प्रक्रियेला बांगलादेशचा प्रतिसाद अत्यंत वेळकाढू असल्याचे सांगितले होते.

मुळात बांगलादेशची ही घुसखोरी आर्थिक कारणाने होते, असा गैरसमज प्रचलित असला तरी प्रत्यक्षात हे बांगलादेशचे दीर्घकालीन षडयंत्र आहे. फाळणीच्या वेळी त्यांचा डोळा पश्चिम बंगाल आणि आसामवर होता. 'ईस्टर्न पाकिस्तान: इट्स पॉप्युलेशन अँड इकॉनॉमिक्स' या पुस्तकात नमूद केल्याप्रमाणे, 'बांगलादेश जर आर्थिकदृष्ट्या मजबूत करायचा असेल तर आसामचे पूर्व पाकिस्तानमध्ये विलिनीकरण आवश्यक आहे'. हे फाळणीच्या काळात शक्य झाले नाही, म्हणून बांगलादेश निर्मितीनंतर हळूहळू घुसखोरीच्या माध्यमातून ही योजना प्रत्यक्षात आणण्याचे उद्योग सुरू होते.

तिस्ता आणि गंगा नदीचे पाणीवाटप आणि बांगलादेशींच्या घुसखोरीबाबत भारत बांगलादेशला अनुकूल भूमिका घेईल याची शक्यता कमी असल्यामुळे बांगलादेशचे नेते आता भारतावर डोळे वटारण्याचा प्रयत्न करत आहेत. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात खलीलुर रहमान यांची झालेली चीन भेट तसेच 'तुमच्या बंगाली मुस्लिमांना बांगलादेशमध्ये ढकलण्याचा प्रयत्न केला तर कारवाई करू' ही त्यांची दमबाजी स्पष्ट सांगत आहे की, बांगलादेश आता कुरापती काढण्याच्या मानसिकतेत आहे.

पाकिस्तान आणि बांगलादेशचे संबंध कधी नव्हे इतके गोड झाले आहेत. बांगलादेशचे गृहमंत्री सलाउद्दीन अहमद आणि पाकिस्तानचे मंत्री मोहसीन रझा यांनी ड्रग्ज तस्करी आणि हवाला रोखण्यासाठी दहा वर्षांच्या सामंजस्य करारावर सह्या केल्या. यात गुप्तचर माहितीच्या देवाणघेवाणीचा सुद्धा प्रस्ताव आहे. पाकिस्तानच्या सिव्हिल सर्व्हिस अकादमीमध्ये बांगलादेशचे कितीतरी वरिष्ठ अधिकारी प्रशिक्षण घेत आहेत. भारतासाठी ही निश्चितपणे धोक्याची घंटा आहे. भारतात आता घुसखोर पाठवता येणार नाहीत; लोकसंख्येचे गणित बिघडवून भारताचा भूभाग लाटण्याचे जे कारस्थान पूर्व पाकिस्तानच्या निर्मितीपासून सुरू झाले आहे, ते पश्चिम बंगालमध्ये भाजपाच्या विजयानंतर उधळले जाणार असे स्पष्ट दिसत असल्यामुळे रहमान यांचे सरकार पिसाळलेले आहे.

रहमान ज्या BNP चे नेते आहेत, तो पक्ष भारतविरोधासाठी आणि जमात-ए-इस्लामीशी असलेल्या घट्ट संबंधांसाठी कुख्यात आहे. रहमान यांनी बांगलादेशच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर भारतविरोधाचा कंड दिसेल अशी उघड विधाने केली नाहीत, परंतु त्यांची कृती मात्र भारताच्या हिताला आड येणारी आहे. युनूस यांच्या कार्यकाळात अटक करण्यात आलेले ब्रह्मचारी चिन्मय कृष्ण दास हे अजूनही तुरुंगात आहेत; ढाका उच्च न्यायालयाने त्यांना अजून जामीन दिलेला नाही. तांदुळापासून साखरेपर्यंत आणि पेट्रोल-डिझेलपासून पाण्यापर्यंत बांगलादेश भारतावर अवलंबून आहे, तरीही तो भारतावर डोळे वटारण्याचे धाडस करू शकतो आणि भारताच्या शत्रूंना कवटाळण्याचे राजकारण करू शकतो, अशी त्यांची करणी आहे. त्यामुळे येत्या काळात पाकिस्तानच्या विरोधात युद्ध भडकले, तर बांगलादेशच्या सीमेवरही खणखणाट होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

(न्यूज डंकाचे संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka