Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
तरुणांनो, स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे !

तरुणांनो, स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे !

NEWS डंका 3 weeks ago

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचा मोलाचा सल्ला

आजच्या तरुणांनी भारत पूर्वीपासूनच आजच्या स्थितीत होता, असे समजू नये. तरुणांना कदाचित वाटते की भारत नेहमीच असा होता. त्यांना वाटते की स्वातंत्र्य म्हणजे आपल्याला वाटेल ते करण्याचा अधिकार.

मात्र स्वातंत्र्य असे नव्हते,' असे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी पुण्यात झालेल्या सत्काराला उत्तर देताना सांगितले. डोवाल यांना देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तेव्हा डोवाल बोलत होते. टिळक स्मारक ट्रस्टतर्फे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

ते म्हणाले की, भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेकांनी मोठा त्याग केला. अनेकांनी आपल्या आयुष्याचे बलिदान दिले आणि मोठ्या संघर्षातून स्वातंत्र्य मिळवले, याची जाणीव तरुणांनी ठेवली पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले. नुकतेच दिल्लीतील जंतर मंतर येथे नीट पेपरफुटीच्या निमित्ताने आंदोलन झाले. त्यात अनेक तरुणांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शिवीगाळ केली, पोलिसांना दगडांनी, लाथाबुक्क्यांनी मारले. त्यादृष्टीने डोवाल यांचा हा संदर्भ महत्त्वाचा ठरला.

भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी देशातील तरुणांना राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे आवाहन केले. वैयक्तिक फायद्यांपेक्षा देशाच्या हिताचा विचार करून काम करण्याची आणि गरज पडल्यास छोट्या वैयक्तिक स्वार्थांचा त्याग करण्याची तयारी तरुणांनी ठेवली पाहिजे, असे डोवाल यांनी सांगितले.

'राष्ट्रहितासाठी पूर्णपणे समर्पित व्हा'

तरुणांनी स्वतःला पूर्णपणे राष्ट्रहितासाठी समर्पित करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन डोवाल यांनी केले. 'वैयक्तिक स्वार्थ बाजूला ठेवा, राष्ट्रहिताला प्राधान्य द्या' असेही ते म्हणाले. त्यांच्या मते, देशाच्या प्रगतीच्या मार्गात वैयक्तिक आणि अल्पकालीन स्वार्थ अडथळा ठरू नयेत. देशहित आणि वैयक्तिक हित यांच्यात संघर्ष निर्माण झाल्यास राष्ट्रहिताची निवड केली पाहिजे. 'आजच्या तरुणांनी स्वतःला पूर्णपणे राष्ट्रहितासाठी समर्पित करण्याचा संकल्प केला पाहिजे. त्यांनी केवळ राष्ट्रहितासाठी काम करण्याचा विचार केला पाहिजे. छोट्या वैयक्तिक हितसंबंधांचा त्याग करण्याची तयारी ठेवली पाहिजे आणि असे विचार मनात आले तरी त्याकडे दुर्लक्ष केले पाहिजे,' असे डोवाल यांनी सांगितले.

'भारतासमोर संधीची खिडकी'

भारत सध्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यातून जात असल्याचे सांगत डोवाल यांनी देशासमोर निर्माण झालेली संधी गमावू नये, असे स्पष्ट केले. आपल्या देशाच्या इतिहासात सध्या संधीची एक खिडकी उघडली आहे. आपण ती गमावण्याची जोखीम घेऊ शकत नाही. सध्या आपले प्राधान्य राष्ट्रनिर्माण हेच असले पाहिजे. भारत आपल्या उद्दिष्टांमध्ये यशस्वी होईल आणि इतिहासात नवा अध्याय लिहील, असा विश्वासही डोवाल यांनी व्यक्त केला. आपण या प्रयत्नात नक्की यशस्वी होऊ आणि इतिहासाचा नवा अध्याय निर्माण करू, असा मला विश्वास आहे,' असे ते म्हणाले.

मोदी आणि शाह यांच्या नेतृत्वाचे कौतुक

डोवाल यांनी भारताला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासारखे नेतृत्व लाभल्याबद्दल देश भाग्यवान असल्याचे म्हटले. अमित शाह यांच्या स्पष्ट दृष्टिकोनाचे आणि देशाप्रती असलेल्या बांधिलकीचे त्यांनी कौतुक केले. शाह यांच्यासोबत काम करण्याची संधी आपल्याला मिळाली असल्याचेही डोवाल यांनी नमूद केले.

लोकमान्य टिळक केवळ स्वातंत्र्यसैनिक नव्हते

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या कार्याचा उल्लेख करताना डोवाल यांनी त्यांना केवळ स्वातंत्र्यसैनिक म्हणून पाहणे अपुरे असल्याचे सांगितले.टिळक हे समाजसुधारक आणि तत्त्वज्ञ देखील होते, असे त्यांनी नमूद केले. पुण्यात प्लेगची साथ आली आणि या आजारात टिळक यांच्या २१ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला, तरीही टिळकांनी शहर सोडले नाही, याचा संदर्भ डोवाल यांनी दिला. त्यातून टिळकांच्या राष्ट्रनिष्ठेची आणि संकटाच्या काळात समाजासोबत उभे राहण्याच्या वृत्तीची प्रचिती येते, असे त्यांनी सांगितले.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka