४१,५८० कोटींच्या डीलला मंजुरी
टाटा मोटर्सला इटलीची व्यावसायिक वाहन कंपनी इव्हेको खरेदी करण्याच्या व्यवहारात मोठे यश मिळाले आहे. इटलीच्या भांडवली बाजार नियामक कन्सॉबने (CONSOB) टाटा मोटर्सच्या खुल्या खरेदी प्रस्तावाला मंजुरी दिली आहे.
टाटा मोटर्सची पूर्ण मालकी असलेली कंपनी टीएमएल सीव्ही होल्डिंग्स बी.व्ही. इव्हेकोचे समभाग खरेदी करण्यासाठी ही ऑफर देत आहे. या संपूर्ण व्यवहाराची किंमत सुमारे ३.८ अब्ज युरो म्हणजेच जवळपास ४१,५८० कोटी रुपये आहे. कन्सॉबच्या मंजुरीमुळे या व्यवहारातील महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला असून आता इव्हेकोच्या भागधारकांना आपले समभाग टाटा मोटर्सला विकण्याची संधी मिळणार आहे.
टाटा मोटर्स प्रत्येक इव्हेको समभागासाठी १४.१० युरो देणार आहे. भागधारकांसाठी ही ऑफर ७ सप्टेंबर ते २६ ऑक्टोबर २०२६ या काळात खुली राहणार आहे. या कालावधीत समभाग विकणाऱ्या भागधारकांना ३० ऑक्टोबरला पैसे मिळण्याची अपेक्षा आहे. काही अटी पूर्ण झाल्यास ऑफर पुन्हा २ ते ६ नोव्हेंबरदरम्यान पाच दिवसांसाठी खुली होऊ शकते. या अतिरिक्त कालावधीत समभाग देणाऱ्यांना १३ नोव्हेंबरला पैसे मिळण्याची शक्यता आहे.
सोनिया गांधींचे आत्मचरित्र हार्परकॉलिन्स इंडिया करणार प्रकाशित
'चीनवरील अवलंबित्वाचा धोका युरोपआधी भारताने ओळखला!'
इव्हेकोची खरेदी टाटा मोटर्ससाठी मोठी महत्त्वाची मानली जात आहे. इव्हेको ही ट्रक, बस आणि इतर व्यावसायिक वाहनांच्या क्षेत्रातील मोठी कंपनी आहे. या व्यवहारामुळे टाटा मोटर्सचा युरोपमधील व्यवसाय मजबूत होण्यास मदत होईल. तसेच कंपनीला इव्हेकोचे तंत्रज्ञान, उत्पादन क्षमता आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील मजबूत नेटवर्क याचा फायदा मिळू शकतो. त्यामुळे या व्यवहाराकडे टाटा मोटर्सच्या जागतिक विस्ताराच्या दिशेने उचललेले मोठे पाऊल म्हणून पाहिले जात आहे.

