Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
तेलंगणात बीआरएसच्या दोन आमदारांना अटक

तेलंगणात बीआरएसच्या दोन आमदारांना अटक

NEWS डंका 1 month ago

विधानसभा अध्यक्षांविरोधातील आक्षेपार्ह वक्तव्य

तेलंगणात सत्ताधारी काँग्रेस आणि विरोधी भारत राष्ट्र समिती अर्थात बीआरएस यांच्यातील राजकीय संघर्ष आणखी तीव्र झाला आहे. विधानसभा अध्यक्ष गड्डम प्रसाद कुमार यांच्याविरोधात कथित आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी बीआरएसचे दोन विधान परिषद सदस्य तत्ता मधुसूदन आणि एन. नवीन कुमार रेड्डी यांना हैदराबाद पोलिसांनी अटक केली आहे.

दोघांविरोधात भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांसह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, सात सप्टेंबर रोजी विधानभवन परिसरात विरोधी पक्षाच्या आमदारांना प्रवेश करण्यापासून रोखण्यात आले होते. यावेळी झालेल्या वादादरम्यान दोन्ही आमदारांनी विधानसभा अध्यक्षांविरोधात अपमानास्पद आणि आक्षेपार्ह भाषा वापरल्याचा आरोप आहे. विधानसभा अध्यक्षांच्या विशेष कर्तव्यावरील अधिकाऱ्याने सैफाबाद पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. तक्रारीत दोन्ही आमदारांनी अध्यक्षांच्या अधिकारावर, घटनात्मक भूमिकेवर आणि सामाजिक प्रतिष्ठेवर प्रश्न उपस्थित करत त्यांना कमी लेखण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

संयुक्त राष्ट्राच्या नव्या नकाशात अरुणाचल, अक्साई चीन स्वतंत्र प्रदेश

या प्रकरणामुळे तेलंगणाच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी कथित वक्तव्यांचा तीव्र निषेध करत, हा केवळ विधानसभा अध्यक्षांचा नव्हे तर तेलंगणातील चार कोटी जनतेचा अपमान असल्याचे म्हटले आहे. काँग्रेसमधील दलित आमदार आणि विधान परिषद सदस्यांनीही कथित वक्तव्यांवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

दरम्यान, बीआरएसचे आमदार तत्ता मधुसूदन यांनी मात्र विधानसभा अध्यक्षांविरोधात कोणतेही आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप फेटाळून लावला आहे. त्यामुळे या अटकेनंतर काँग्रेस आणि बीआरएसमधील राजकीय संघर्ष आणखी चिघळण्याची शक्यता आहे. विधानभवनाबाहेरील एका वादातून सुरू झालेला हा प्रकार आता थेट कायदेशीर कारवाईपर्यंत पोहोचला असून, या प्रकरणाकडे तेलंगणाच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka