Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
विकसित भारतासाठी मोदींचा 'सप्तधारा' मंत्र

विकसित भारतासाठी मोदींचा 'सप्तधारा' मंत्र

८० व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधन

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८० व्या स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित केले. भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनवण्याच्या उद्दिष्टाला गती देण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात 'सप्तधारा' या सात सूत्री विकास आराखड्याची घोषणा केली.

उत्पादन, शेती, तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा, संरक्षण, हरित-निळी अर्थव्यवस्था आणि भारताची सॉफ्ट पॉवर या सात क्षेत्रांना देशाच्या विकासाचे प्रमुख आधारस्तंभ बनवण्याचे संकेत मोदी यांनी दिले.

लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना मोदी यांनी 'सप्तधारा'ची तुलना प्राचीन भारतातील 'सप्तसिंधू'शी केली. 'गेल्या पाच ते सात दशकांत जे साध्य होऊ शकले नाही, ते येत्या काळात साध्य करण्याचे लक्ष्य आहे,' असे त्यांनी सांगितले. या माध्यमातून विकासाला नवी गती आणि नवी दिशा देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भारताला आपल्या महत्त्वाकांक्षा साकार करण्यासाठी विकासाच्या 'नव्या प्रवाहाची' गरज असल्याचे सांगितले.

काय आहेत 'सप्तधारा'चे सात आधारस्तंभ?

उत्पादन क्षेत्राची ताकद

भारताला जागतिक पुरवठा साखळीतील विश्वासार्ह केंद्र बनवण्यावर मोदी यांनी भर दिला. घटकनिर्मितीपासून डिझाइन आणि अंतिम उत्पादनापर्यंत संपूर्ण मूल्यसाखळी भारतात विकसित करण्याचे लक्ष्य आहे. भारतीय उत्पादनांनी किंमत, गुणवत्ता आणि उत्पादनाच्या प्रमाणात जागतिक स्पर्धेत उतरावे, तसेच 'झिरो डिफेक्ट' आणि अचूक उत्पादन ही भारताची ओळख बनावी, असे मोदी म्हणाले.

शेती आणि अन्नप्रक्रिया

भारताला जागतिक 'फूड पॉवरहाऊस' बनवण्यासाठी शेती आणि अन्नप्रक्रिया क्षेत्रावर भर दिला जाणार आहे. कृषी उत्पादनाला अधिक मूल्य मिळवून देण्यासोबतच कृषी निर्यात वाढवण्याचे लक्ष्य आहे. खतांच्या आंतरराष्ट्रीय किमतीतील चढ-उतारापासून शेतकऱ्यांना संरक्षण देण्याचाही मोदी यांनी उल्लेख केला.

तंत्रज्ञान आणि नवोन्मेष

तंत्रज्ञान आणि इनोव्हेशन हे विकसित भारताच्या प्रवासातील तिसरे महत्त्वाचे सूत्र आहे. देशाची तांत्रिक क्षमता वाढवणे आणि नवोन्मेषाला आर्थिक विकासाचे प्रमुख इंजिन बनवणे, हा या घटकाचा केंद्रबिंदू आहे.

गती शक्ती आणि पायाभूत सुविधा

चौथा आधारस्तंभ म्हणजे गती शक्ती. जागतिक दर्जाची, वेगवान आणि अखंड कनेक्टिव्हिटी उभारण्यावर भर दिला जाणार आहे. रस्ते, रेल्वे, लॉजिस्टिक्स आणि इतर पायाभूत सुविधांच्या माध्यमातून माल, सेवा आणि नागरिकांची वाहतूक अधिक वेगवान करण्याचा उद्देश आहे.

संरक्षण शक्ती आणि आत्मनिर्भर संरक्षण

राष्ट्रीय सुरक्षेसाठी संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरता वाढवणे हा पाचवा आधारस्तंभ आहे. पेट्रोल-डिझेल, खते, औषधे आणि तंत्रज्ञानातील चिप्स यांसारख्या महत्त्वाच्या संसाधनांचा जागतिक पातळीवर धोरणात्मक वापर केला जात असल्याचे मोदी यांनी नमूद केले. त्यामुळे संरक्षणासह महत्त्वाच्या क्षेत्रांत देशांतर्गत क्षमता निर्माण करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

हरित आणि निळी अर्थव्यवस्था

सहाव्या सूत्रात पर्यावरणपूरक विकासासोबत समुद्राधारित अर्थव्यवस्थेलाही महत्त्व देण्यात आले आहे. भारताची मोठी किनारपट्टी, मत्स्यव्यवसाय आणि सागरी क्षेत्राचा जागतिक व्यापारासाठी अधिक प्रभावी वापर करण्यावर भर असेल. सीफूडसह विविध क्षेत्रांना जागतिक बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची संधी असल्याचे मोदी यांनी सांगितले.

भारताची सॉफ्ट पॉवर

सप्तम सूत्र भारताच्या सांस्कृतिक आणि जागतिक प्रभावाशी संबंधित आहे. भारताची उत्पादने जागतिक बाजारपेठेत पोहोचवण्याचे आवाहन मोदी यांनी केले. २०१४ पासून जवळपास ४० देशांसोबत झालेल्या मुक्त व्यापार करारांचा (FTA) भारतीय उद्योगांनी, विशेषतः MSME क्षेत्राने, फायदा घ्यावा, असे त्यांनी सांगितले. मात्र जागतिक बाजारपेठेत उतरताना गुणवत्ता आणि किमतीच्या बाबतीत जागतिक मानकांशी तडजोड न करण्याचा संदेशही त्यांनी दिला.

आशिया कपआधी दीप्तीचा गेमप्लॅन तयार

भारताचा परकीय चलनसाठ्यात विक्रमी वाढ; ७०७ अब्ज डॉलरचा टप्पा पार

५१ वर्षांचा दुष्काळ संपवणार; मनप्रीतचा 'मिशन वर्ल्ड कप'!

अभिषेक पोरेलच्या जामीन अर्ज फेटाळत १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

'रिफॉर्म एक्स्प्रेस'ला वेग देण्याचे आवाहन

'सप्तधारा'सोबतच मोदी यांनी 'रिफॉर्म एक्स्प्रेस'चा उल्लेख करत कामाची पद्धत, विचारसरणी आणि अंमलबजावणीचा वेग बदलण्याची गरज व्यक्त केली. विकसित भारताचे लक्ष्य गाठण्यासाठी पारंपरिक व्यवस्था आणि कार्यपद्धतीत सुधारणा कराव्या लागतील, असे त्यांनी सांगितले. पुढील पाच ते सात वर्षे या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असल्याचेही मोदी यांनी स्पष्ट केले. त्यामुळे 'सप्तधारा' हा केवळ सात क्षेत्रांचा आराखडा नसून २०४७ पर्यंत विकसित भारताच्या उद्दिष्टाला वेग देण्याचा व्यापक रोडमॅप म्हणून मोदींच्या भाषणातून समोर आला आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka