Dailyhunt
विल जॅक्सने शेन वॉटसनच्या विश्वविक्रमाची बरोबरी

विल जॅक्सने शेन वॉटसनच्या विश्वविक्रमाची बरोबरी

NEWS डंका 2 months ago

टी-२० विश्वचषक २०२६ स्पर्धेत इंग्लंडने दमदार पुनरागमन करत उपांत्य फेरी गाठली आहे. या प्रवासात संघाचा सर्वात मोठा मॅचविनर ठरला तो अष्टपैलू विल जॅक्स.

इंग्लंडने स्पर्धेची सुरुवात नेपाळविरुद्ध काठावरच्या विजयाने केली होती.

त्यानंतर वेस्ट इंडिजकडून पराभव पत्करावा लागल्याने सुपर-८ गाठणे कठीण वाटत होते. मात्र इंग्लंडने शानदार खेळ करत केवळ सुपर-८च नाही, तर उपांत्य फेरी गाठणारा पहिला संघ होण्याचा मान मिळवला.

या यशात विल जॅक्सचा सिंहाचा वाटा आहे. स्फोटक फलंदाजी आणि उपयुक्त फिरकी गोलंदाजीसाठी ओळखला जाणारा जॅक्स सध्या खालच्या क्रमांकावर फलंदाजी करत असला तरी मर्यादित संधींत त्याने सामन्याचे चित्र पालटले. गरजेच्या वेळी तुफानी फटकेबाजी आणि निर्णायक क्षणी बळी मिळवत त्याने इंग्लंडला विजयाच्या मार्गावर नेले.

जॅक्सने ७ सामन्यांतील ७ डावांत ६३.६६ च्या सरासरीने आणि १७६.८५ च्या स्ट्राइक रेटने १९१ धावा केल्या आहेत. त्याची सर्वोच्च खेळी नाबाद ५३ धावांची आहे. विश्वचषकात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो १२व्या स्थानावर आहे. त्याच्यापेक्षा अधिक धावा केवळ कर्णधार हॅरी ब्रूकने केल्या आहेत. ब्रूकने ७ सामन्यांत १ शतकासह २२८ धावा केल्या आहेत.

फलंदाजीसोबतच जॅक्सने ७ बळीही घेतले आहेत.

अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर विल जॅक्सला या स्पर्धेत आतापर्यंत ४ वेळा 'सामनावीर' पुरस्कार मिळाला आहे. एका टी-२० विश्वचषकात सर्वाधिक वेळा सामनावीर ठरण्याच्या शेन वॉटसनच्या विक्रमाशी त्याने बरोबरी साधली आहे. वॉटसनने २०१२ च्या विश्वचषकात ४ वेळा हा मान मिळवला होता. तर २०२२ मध्ये झिंबाब्वेचा कर्णधार सिकंदर रझा ३ सामनावीर पुरस्कारांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.

आता इंग्लंडसमोर उपांत्य फेरीचा सामना आहे. या सामन्यातही विल जॅक्सने अष्टपैलू चमक दाखवली तर तो केवळ संघाला अंतिम फेरीत पोहोचवणार नाही, तर एका विश्वचषकात सर्वाधिक सामनावीर पुरस्कार जिंकण्याचा विक्रम आपल्या नावावर करू शकतो.

इंग्लंडच्या उपांत्य फेरीतील आशा आता मोठ्या प्रमाणात विल जॅक्सवरच अवलंबून आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka