गणेश विसर्जनासाठी मुंबईकरांची होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने विशेष लोकलची व्यवस्था केली आहे. २५ आणि २६ सप्टेंबरच्या मध्यरात्री चर्चगेट-विरार मार्गावर तब्बल १२ अतिरिक्त धीम्या लोकल धावणार आहेत.
विसर्जनानंतर घरी परतणाऱ्या भाविकांना रात्रीच्या वेळी प्रवासाची सुविधा मिळावी, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
चर्चगेटहून विरारच्या दिशेने सहा विशेष लोकल सोडण्यात येणार आहेत. या लोकल रात्री १.१५, १.४५, २.१५, २.५५, ३.१५ आणि ३.४५ वाजता चर्चगेटहून सुटतील. या सर्व लोकल चर्चगेटपासून विरारपर्यंत धावणार असून मार्गातील प्रमुख स्थानकांवर त्यांना थांबे असतील.
विरारहून चर्चगेटच्या दिशेनेही सहा विशेष लोकल उपलब्ध असतील. रात्री १२.१५, १२.३०, १.१०, १.३०, २ आणि ३ वाजता विरारहून या विशेष गाड्या सुटतील. शेवटची विशेष लोकल पहाटे ४.४० वाजता चर्चगेटला पोहोचेल.
गणेश विसर्जनाच्या दिवशी प्रवाशांची सुरक्षितता आणि भाविकांची गर्दी सुरळीतपणे हाताळण्यासाठी पश्चिम रेल्वेने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. २५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ ते रात्री ८.३० या वेळेत मुंबई सेंट्रल ते चर्चगेटदरम्यान धावणाऱ्या ३७ बारा डब्यांच्या अप फास्ट लोकलना सर्व स्थानकांवर थांबा देण्यात येणार आहे.
दरम्यान, चार्नी रोड स्थानकावरील गर्दी नियंत्रित करण्यासाठी २५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ६ ते रात्री ११.३० वाजेपर्यंत ८४ अप धीम्या लोकलना प्लॅटफॉर्म क्रमांक २ वर थांबा दिला जाणार नाही. प्लॅटफॉर्म क्रमांक २ आणि ३ वर प्रवाशांची गर्दी वाढू नये आणि वाहतूक सुरळीत राहावी, हा यामागील उद्देश आहे.
गणेश विसर्जनासाठी रेल्वेने केलेल्या या विशेष व्यवस्थेमुळे रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या भाविकांना दिलासा मिळणार असून, गर्दीच्या काळात लोकल सेवा अधिक सुरळीत ठेवण्यास मदत होणार आहे.

