Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
यशासाठी त्याग आवश्यक, शॉर्टकट घेतला तर पोल उघडेल

यशासाठी त्याग आवश्यक, शॉर्टकट घेतला तर पोल उघडेल

भारताचे महान फलंदाज सचिन तेंडुलकर यांनी युवा खेळाडूंना आणि पालकांना महत्त्वाचा संदेश देताना सांगितले की, यश मिळवण्यासाठी मेहनत, शिस्त आणि त्याग आवश्यक आहे. शॉर्टकट वापरून कधीच मोठं यश मिळत नाही, असे स्पष्ट शब्दांत त्यांनी सांगितले.

अहमदाबाद येथे आयोजित 'SRT10 अल्टेवोल सेंटर ऑफ एक्सीलेंस'च्या उद्घाटन कार्यक्रमात सचिन सहभागी झाले होते. या कार्यक्रमाला आयसीसीचे चेअरमन जय शाह आणि गुजरातचे उपमुख्यमंत्री हर्ष संघवी देखील उपस्थित होते.

सचिन म्हणाले,
'प्रत्येक पालकांना आपली मुलं यशस्वी व्हावीत असं वाटतं. पण त्यासाठी मुलांवर दबाव टाकण्यापेक्षा त्यांना स्वातंत्र्य आणि प्रोत्साहन देणं अधिक महत्त्वाचं आहे. स्वातंत्र्य आणि आत्मविश्वास यांची जोडीच यश निर्माण करते.'

त्यांनी आपल्या बालपणीच्या आठवणी सांगताना म्हटलं की,
'माझ्या आई-वडिलांनी कधीही माझ्यावर दबाव टाकला नाही. सुरुवातीच्या दोन सामन्यांत मी शून्यावर बाद झालो होतो. तिसऱ्या सामन्यात फक्त एक धाव केली, पण त्या एका धावेनेही मला आनंद दिला होता.'

युवा खेळाडूंना मार्गदर्शन करताना सचिन म्हणाले की,
'प्रत्येक वेळी मैदानात उतरल्यावर यश मिळेलच असं नाही. पण प्रत्येक वेळी पूर्ण तयारी करून मैदानात उतरता येतं. मेहनत, शिस्त आणि फोकस हे तुमच्या हातात असतं.'

ते पुढे म्हणाले,
'टॅलेंट ही देवाची देणगी असते, पण त्या टॅलेंटसाठी तुम्ही किती मेहनत करता हेच खऱ्या अर्थाने महत्त्वाचं असतं. मी अनेक प्रतिभावान खेळाडू पाहिले, पण मेहनतीअभावी त्यांना मोठं यश मिळालं नाही.'

सचिन यांनी स्पष्ट सांगितले की,
'जर तुम्हाला भारतासाठी खेळायचं असेल, तर अनेक गोष्टींचा त्याग करावा लागेल. यशासाठी कोणताही शॉर्टकट नसतो. क्रिकेट हे संपूर्ण जगासमोर खेळलं जाणारं मैदान आहे. इथे शॉर्टकट घेतला, तर सत्य लगेच समोर येतं.'

शेवटी त्यांनी सांगितले की,
'अकॅडमीचं उद्दिष्ट फक्त चांगले खेळाडू तयार करणं नाही, तर चांगले माणूस घडवणं देखील आहे.'

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka