Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
यूएईकडून ५ हजार बांगलादेशी नागरिकांचा व्हिसा रद्द

यूएईकडून ५ हजार बांगलादेशी नागरिकांचा व्हिसा रद्द

NEWS डंका 1 month ago

नोकरी, व्यवसाय आणि कुटुंबांवर संकट

संयुक्त अरब अमिरातीने (यूएई) सुमारे ४,८०० बांगलादेशी नागरिकांचे व्हिसा अचानक रद्द केल्याने मोठे संकट निर्माण झाले आहे. सुट्टीसाठी बांगलादेशात गेलेले हे नागरिक आता यूएईमध्ये परतू शकत नसल्याने त्यांच्या नोकऱ्या, व्यवसाय आणि कुटुंबांवर अनिश्चिततेचे सावट आले आहे.

विशेष म्हणजे, अनेकांना व्हिसा रद्द करण्यामागचे कारणही स्पष्टपणे सांगण्यात आलेले नाही. जुलैपासून अनेक नागरिकांना ई-मेल किंवा संदेशाद्वारे व्हिसा रद्द झाल्याची माहिती मिळाली.

यूएईमध्ये सुमारे १२ लाख बांगलादेशी नागरिक राहतात. बांधकाम, उत्पादन आणि वाहतूक यांसारख्या क्षेत्रांमध्ये मोठ्या संख्येने बांगलादेशी कामगार कार्यरत आहेत. अनेक कामगारांनी परदेशात नोकरी मिळवण्यासाठी मोठी रक्कम खर्च केली आहे आणि त्यांच्या मायदेशातील कुटुंबांचा खर्च यूएईमधून पाठवलेल्या पैशांवर अवलंबून आहे. २०२३-२४ या कालावधीत यूएईतील बांगलादेशी नागरिकांनी सुमारे ३.६५ अब्ज डॉलर मायदेशी पाठवले होते. त्यामुळे या व्हिसा रद्दीकरणाचा परिणाम हजारो कुटुंबांच्या आर्थिक स्थितीवर होऊ शकतो.

मक्काजवळ ड्रोन हल्ल्याच्या प्रयत्नावर भारताची चिंता

शहापूरजवळ कार-ट्रकच्या धडकेत दोन चिमुकल्यांसह चौघांचा मृत्यू

काँग्रेस आमदाराची भाची सरकारी नोकरीसोबत करत होती 'एमडी'

या निर्णयामुळे प्रभावित झालेल्यांमध्ये यूएईमध्ये तब्बल २७ वर्षे राहिलेल्या अबुल कलाम आझाद यांचाही समावेश आहे. ते ७ एप्रिल रोजी बांगलादेशात गेले होते. मात्र, २४ जुलै रोजी त्यांना ई-मेलद्वारे त्यांचा व्हिसा रद्द झाल्याची माहिती मिळाली. व्हिसा रद्द करण्याचे कोणतेही कारण त्यांना सांगण्यात आले नाही. अशाच प्रकारच्या तक्रारी इतर नागरिकांनीही केल्या आहेत. काही नागरिकांचे व्यवसाय आणि कुटुंबीय यूएईमध्ये असतानाही त्यांना परतता येत नसल्याने परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे.

या प्रकरणाची दखल बांगलादेश सरकारने घेतली असून यूएईसोबत राजनैतिक पातळीवर चर्चा सुरू केली आहे. प्रभावित नागरिकांनी पुनर्वसन, आर्थिक मदत आणि पुन्हा यूएईमध्ये जाण्याची संधी मिळावी, अशी मागणी केली आहे. व्हिसा रद्द करण्यामागचे अधिकृत कारण यूएईकडून अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही. मध्यपूर्वेतील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा तपासणी आणि छाननी वाढल्याचे काही जाणकारांचे म्हणणे आहे; मात्र त्याचा थेट संबंध या व्हिसा रद्दीकरणाशी असल्याचे अधिकृतपणे स्पष्ट झालेले नाही.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: News Danka