Tuesday, 01 Oct, 11.59 am News 18 लोकमत

होम
'अबकी बार ट्रम्प सरकार' म्हणत PM मोदींनी केला प्रचार? परराष्ट्र मंत्र्यांनी दिलं स्पष्टीकरण

वॉशिंग्टन, 01 सप्टेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 22 सप्टेंबरला अमेरिकेतील ह्यूस्टन इथं हाउडी मोदी कार्यक्रमात भाषण केलं होतं. यावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्पसुद्धा उपस्थित होते. ट्रम्प यांची उपस्थिती म्हणजे तिथल्या आगामी राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत अमेरिकेतील भारतीयांचे समर्थन मिळवण्यासाठीच होती असंही म्हटलं जात आहे. दरम्यान विरोधी पक्षांनी दावा केला की, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या कार्यक्रमात अबकी बार ट्रम्प सरकार अशी घोषणा करून डोनाल्ड ट्रम्प यांच्यासाठी प्रचार केला. विरोधकांच्या या आरोपाला परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी उत्तर दिलं आहे.

परराष्ट्र मंत्री जयशंकर हे तीन दिवसाच्या वॉशिंग्टन दौऱ्यावर गेले आहेत. त्यावेळी त्यांनी भारतीय पत्रकारांशी चर्चा केली. तेव्हा जयशंकर यांना विचारण्यात आलं की, हाउडी मोदी या कार्यक्रमाच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींनी ट्रम्प यांचा प्रचार केला का? यावर उत्तर देताना जयशंकर यांना हा दावा फेटाळून लावला. मोदींनी कोणताही प्रचार केला नाही. मोदी काय म्हणाले ते नेमकं समजून घ्यायला हवं. मोदी मागच्या निवडणुकीबद्दल बोलत होते. 2016 च्या निवडणुकीत ट्रम्प यांनी स्वत: अबकी बार ट्रम्प सरकार अशी स्लोगन वापरली होती.

जयशंकर म्हणाले की, पंतप्रधान मोदींच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढायला नको. यातून कोणाचंही भलं होणार नाही. अमेरिकेसोबत भारताचा दृष्टीकोन निष्पक्ष आहे. अमेरिकेत जे काही होत आहे ते त्यांच्या राजकारणाचा भाग आहे. त्याता भारताचा काही संबंध नाही असंही परराष्ट्र मंत्र्यांनी स्पष्ट केलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कार्यक्रमावेळी डोनाल़्ड ट्रम्प यांचे कौतुक केलं होतं. ट्रम्प यांच्याशी भारताचे चांगले संबंध आहेत. त्यांना कोणत्याही ओळखीची गरज नाही. अब्जावधी लोक त्यांचा शब्द पाळतात. जागतिक राजकारणातील ट्रम्प एक मोठं नाव आहे असंही मोदी म्हणाले होते.

ट्रम्प यांच्याशी भेटीचा अनुभव सांगताना मोदींनी त्यांच्या स्वभावाबद्दल सांगितलं होतं. प्रत्येक भेटीत एक उत्साही व्यक्तिमत्व, वावरण्यातला सहजपणा आणि मित्रता दिसून येते. त्यांच्यातील नेतृत्व क्षमता आणि अमेरिकेसाठीची धडपड याचे कौतुक वाटते असंही मोदी म्हटले होते.

दरम्यान, राहुल गांधी यांनी ट्विटरवरून पलटवार केला आहे. राहुल गांधींनी म्हटलं की, पंतप्रधानांच्या चुका झाकल्याबद्दल धन्यवाद. त्यांच्या अशा कृतींमुळे भारतात समस्या निर्माण झाल्या आहेत. तुमच्यामुळे यापुढे असं काही होणार नाही. परराष्ट्र मंत्री म्हणून तुम्ही त्यांना कूटनितीचे धडे द्या असंही राहुल गांधी म्हणाले.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: News18 Lokmat
Top