Saturday, 28 Sep, 5.03 pm News 18 लोकमत

होम
इम्रान खान यांच्या 47 मिनिटांच्या भाषणाला या भारतीय महिला अधिकाऱ्याने 6 मिनिटांत दिलं सडेतोड उत्तर

न्यूयॉर्क, 28 सप्टेंबर : संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचंही भाषण झालं. इम्रान खान यांनी या भाषणात भारतावर एकामागोमाग एक खोटे आरोप केले. आपल्या 47 मिनिटांच्या भाषणात त्यांनी काश्मीर, बालाकोट हल्ला या मुद्यांवर खोट्या कहाण्या सांगत बतावणी सुरू केली.

इम्रान खान यांनी खोटे दावे केल्यामुळे भारताने त्याला उत्तर देण्यासाठी 'राइट टू रिप्लाय' नुसार हक्क मागितला. इम्रान खान यांनी केलेल्या भाषणाला परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रधान सचिव विदिशा मैत्रा यांनी उत्तर दिलं. त्यांनी या भाषणात इम्रान खान यांचा बुरखा फाडला.

त्या म्हणाल्या, संयुक्त राष्ट्रांमधल्या या व्यासपीठावर बोलला गेलेला एक शब्द ऐतिहासिक असतो. पण दुर्दैवाने पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी जगाचं अत्यंत वाईट चित्रण केलं. आम्ही विरुद्ध ते, श्रीमंत विरुद्ध गरीब, उत्तर विरुद्ध दक्षिण, विकसित विरुद्ध विकसनशील, मुस्लीम विरुद्ध अन्य असा या भाषणाचा सूर होता. त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या विभाजनाला खतपाणी घालणारी पटकथाच लिहिली. मतभेद आणि द्वेष पसरवणारं हे हेट स्पीच होतं, असंच म्हणावं लागेल.

(हेही वाचा : 'काश्मिरी मुस्लिमांचा पुळका पण चिनी मुस्लिमांचं काय? ट्रम्प यांचा इम्रानना दणका)

ही कोणती भाषा ?

उद्धवस्त होणं, रक्तपात, वंशवाद, बंदुका उगारणं, शेवटपर्यंत लढाई करा असे सगळे शब्द आणि वाक्य म्हणजे मध्ययुगातली मानसिकता दर्शवणारे आहेत. ही भाषा एकविसाव्या शतकाची नाही, हे त्यांनी सगळ्यांच्या लक्षात आणून दिलं. संयुक्त राष्ट्रांनी दहशतवादी म्हणून घोषित केलेले 130 दहशतवादी आणि 25 दहशतवादी संघटना पाकिस्तानमध्येच आहेत की नाही याबद्दल पाकिस्तानने स्पष्टीकरण द्यावं, असं विदिशा मैत्रा म्हणाल्या.

दहशतवाद्यांना पेन्शन

अल कायदा आणि इस्लामिक स्टेट या संघटनांमध्ये असलेल्या लोकांना पेन्शन देणारा पाकिस्तान हा एकमेव देश आहे, याचीही त्यांनी आठवण करून दिली. पाकिस्तानमधले ख्रिश्चन, शीख, अहमदी, हिंदू, शिया, पश्तुन, सिंधी आणि बलुच अशा अल्पसंख्याक समुदायावर अत्याचार होत असतात. पाकिस्तानने जिथे द्वेष आणि दहशतवादाला नेहमीच खतपाणी घातलं त्याच काश्मीरमध्ये भारत मात्र विकासावर भर देत आहे, असंही त्या म्हणाल्या.

युतीसंदर्भात शिवसेना काय निर्णय घेणार? यासोबत इतर टॉप 18 बातम्या

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: News18 Lokmat
Top