Monday, 23 Sep, 8.12 am News 18 लोकमत

होम
विराटची एक चूक अन् टीम इंडियाचा फ्लॉप शो, भारतानं गमावली मालिका

बेंगळुरू, 23 सप्टेंबर : भारतीय क्रिकेट संघ सर्वात बलाढ्य असा समजला जातो. संघात रनमशिन विराट कोहली, हिटमॅन रोहित शर्मा, गब्बर शिखर धवन आणि अष्टपैलू हार्दिक पांड्या यांच्यासारखे खेळाडू आहेत. तरीही भारताला दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी20 मालिकेत विजय मिळवता आला नाही. बेंगळुरूत झालेल्या तिसऱ्या टी20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं 9 गडी राखून विजय मिळवला. यासह तीन टी20 सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली.

टीम इंडियाच्या पराभवात विराट कोहलीचा चुकीच्या निर्णयाचा वाटा मोठा ठरला. कर्णधार विराट कोहलीनं चिन्नास्वामी स्टेडियमवर नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. या मैदानावर दुसऱ्यांदा फलंदाजी करणं सोपं जातं. तिथं दव पडत असल्यानं पाठलाग करणाऱ्या संघाला फायदा होतो. तरीही विराटने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.

भारताची आघाडीची फळी पुर्णपणे ढेपाळली. रोहित शर्मा, विराट कोहली लवकर बाद झाले. धवनने 36 धावांची खेली केली मात्र मोठी धावसंख्या उभारू शकला नाही. हार्दिक पांड्या 18 चेंडूत 14 धावाच करू शकला. मधल्या फळीत पुन्हा निराशाच हाती आली. पंत आणि जडेजाने प्रत्येकी 19 धावा केल्या. तर श्रेयस अय्यरने 5 आणि कृणाल पांड्यानं 4 धावा केल्या.

आफ्रिकेच्या डावखुऱ्या गोलंदाजांनी भारताच्या फलंदाजीला खिंडार पाडलं. आफ्रिकेचा फिरकीपटू फोर्टुइननं 3 षटकांत 19 धावा देत 2 गडी बाद केले. ब्यूरॉन हेन्ड्रिक्सनं 4 षटकांत 14 धावा देत 2 गडी बाद केले. तर शम्सीनं 4 षटकांत 23 धावात 1 गडी बाद केला. या गोलंदाजांनी 11 षटकांत फक्त 56 धावा देत 5 गडी बाद केले.

भारताच्या फलंदाजीसोबत गोलंदाजांनीदेखील सुमार कामगिरी केली. नव्या चेंडूवर विकेट घेण्यात गोलंदाजांना अपयश आलं. दीपक चाहर आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी जबरदस्त गोलंदाजी केली पण नवदीप सैनी चमक दाखवू शकला नाही. त्यानं 2 षटकांत 25 धावा दिल्या. कृणाल पांड्याने 3.5 षटकांत 40 धावा दिल्या. तर हार्दिक पांड्यानेही 2 षटकांत 23 धावा दिल्या.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: News18 Lokmat
Top