नाशिक : महिला लैंगिक अत्याचारातील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी स्थापन केलेल्या एसआयटीची पाहिली पत्रकार परिषद आज (मंगळवार) IPS तेजस्वी सातपुते यांनी घेतली. अशोक खरातवर एकूण 12 गुन्हे दाखल करुन, महिला अत्याचाराचे 8 आणि आर्थिक फसवणुकीचे 4 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
तेजस्वी सातपुते म्हणाल्या, ‘अशोक खरात याच्याविरोधात आतापर्यंत एकूण 12 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, त्यातील नाशिकच्या सरकारवाडा पोलिस ठाण्यात 10 गुन्हे आहेत. त्यापैकी 8 गुन्हे लैगिक शोषणाचे तर 2 गुन्हे फसवणुकीचे आहेत. याव्यतिरिक्त शिर्डी आणि रहाता या दोन ठिकाणी प्रत्येकी एक गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही गुन्हे फसवणुकीचे आहेत. या दोन्ही गुन्ह्याचा तपास शिर्डी पोलिस करत आहेत, राहता येथील गुन्हा देखील शिर्डी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे.’
Buy Maharashtrache Dada BookDiscount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949
नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील वावी पोलिसात अशोक खरात याने राजेंद्र जासूद आणि दिनेश परब याच्या विरोधात 5 कोटींच्या खंडणीचा गुन्हा दाखल केला होता, तर शिर्डी पोलिसांत अशोक खरातचा ऑफिस बॉय नीरज जाधव याच्याविरोधात एका महिलेने बनावट व्हिडीओ व्हायरल करायची धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला होता, या दोन गुन्ह्यामुळे अशोक खरातचे बिंग फुटले आणि हळूहळू करवाईचा फास अवळण्यास सुरवात झाली, याच दोन गुन्ह्यानंतर राज्य सरकारने SIT ची स्थापना केली, अशी माहिती तेजस्वी सातपुते यांनी दिली.
अशोक खरात प्रकरणी 20 मार्चपासून एसआयटीने तपास सुरू केला आहे, नाशिकमधील तो गुन्हा आणि त्याशिवाय ते 10 असे एकूण 11 गुन्हे एसआयटीकडे तपासाला आहेत. सदर विशेष तपास पथकामध्ये तपास अधिकारी म्हणून दोन पोलिस उपाधीक्षक आहेत, जे माझ्यासोबत दोघे इथं उपस्थित आहेत. त्याच पद्धतीने सहाय्यक तपास अधिकारी म्हणून तीन पोलिस निरीक्षक, तीन सहाय्यक पोलिस निरीक्षक, 10 पोलिस उपनिरीक्षक आणि 6 पोलिस अंमलदार असे एकूण 24 लोकांचे आपलं पथक तपासासाठी कार्यरत आहे. त्यापैकी, काही लोक इतर उपस्थित आहेत, काही लोक उपस्थित राहू शकले नाहीत. अशोक खरात याच्या विरुद्ध नाशिक आणि नगर जिल्हा या दोन्हींमध्ये मिळून एकूण 12 गुन्हे दाखल झालेले आहेत, अशी माहिती तेजस्वी सातपुते यांनी दिली.
आजपर्यंतच्या तपासा दरम्यान 30 पेक्षा अधिक साक्षीदारांकडं आपण विचारपूस केलेली आहे, साक्षीदारांकडे आणि पीडितेंकडे आपण जी चौकशी केली त्यातून आरोपी हा पीडित व्यक्ती आणि कुटुंबाच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत होता, त्यांना भीती दाखवत होता. खडे, चिंचोके, रुद्राक्ष, पूजा विधि इत्यादी गोष्टींच्या माध्यमातून त्यांच्याकडून पैसा उकळत होता. महिलांना स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचे भासवत होता, त्यांच्या कुटुंबीयांच्या मृत्यूची भीती दाखवून त्यांना बदनामी करण्याची धमकी देऊन त्यांचं लैंगिक शोषण करत होता. त्याच पद्धतीने ईशानेश्वर मंदिराच्या परिसरात अंधारामध्ये हातचलाकीने स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचे भासवून समाजामध्ये सातत्याने अंधश्रद्धा पसरवण्याचे कामही अशोक खरात करत होता, अशी माहिती सातपुते यांनी दिली.
महिला अत्याचाराच्या संदर्भात दाखल आठही गुन्ह्यांमध्ये पीडित आणि त्यांचे कुटुंबीय हे अतिशय धाडसाने सामोर आले समोर आलेले आहेत. त्यांनी फिर्याद दाखल केली आहे, त्याच्यामुळेच आपण आरोपीवरती कायदेशीर कारवाई करू शकत आहोत. आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून मी आव्हान करू इच्छिते की, या महिलांनी लोक काय म्हणतील या भीतीने अन्याय सहन केलेला आहे आणि आता अतिशय धाडसाने कुटुंबाला विश्वासात घेऊन त्यांनी गुन्हे दाखल केलेले आहेत. त्यामुळे त्यांची ओळख उघड न करणे, सोशल मीडियावरती त्यांचे व्हिडिओज न पसरवणे आपल्या मोबाईल्समध्ये असे व्हिडिओ न बाळगणे हे आपल्या सगळ्यांचं नैतिक कर्तव्य आहेत. याशिवाय, सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाचे देखील तसे कठोर निर्देश आहेत. त्यांची ओळख गोपनीय राहणे आणि त्यांच्या खासगी बाबींची सार्वजनिक चर्चा न होणे हे त्यांच्या मानसिक आरोग्यासाठी आणि त्यांचं धैर्य टिकून राहण्यासाठी अतिशय गरजेचे आहे. म्हणूनच न्यायसंस्थेने वारंवार आयडेंटिटी डिस्लोजर अशी भूमिका ठेवलेली आहे, अशा केसेसमध्ये पोलिसांच्या पत्रकार परिषदेत बाबतीत देखील मर्यादा निश्चित करण्यात आलेल्या आहेत. पीडितेच्या गोपनीयतेचा भंग ज्या समाज माध्यमातून झाला आहे, अशा प्लॅटफॉर्मवरून ती माहिती हटवण्याबाबत न्यायालयाचे निर्देश आहेत, असे सातपुते यांनी सांगितले.
भारतीय संविधानानुसार पीडिताला जगण्याचा अधिकार, गोपनीयतेचा अधिकार आणि प्रतिष्ठेचा अधिकार आहे. त्याचे संरक्षण करत जुलै 2025 मध्ये मद्रास उच्च न्यायालयाने एका महिला वकिलाचे तिच्या संमतीशिवाय चित्रण केलेले खासगी स्वरूपाचे फोटो, व्हिडिओ तात्काळ काढून टाकण्याचं आदेश दिले होते. अशा प्रकारची सामग्री रोखणं हे राज्याचं कर्तव्य आहे असं न्यायालयाने त्यावेळेला अधोरेखित केलं होतं. याप्रकरणी, व्हिडिओ जे आहेत ते प्रसारित झाले होते, त्याच्या एकूण 4,650 लिंक एसआयटीच्या सायबर टीमने शोधून काढल्या. आपली 24 लोकांची टीम असून त्यामध्ये चार लोकांची सायबर टीम आहे, या सायबर टीमचे पूर्णवेळ कर्तव्य हे होतं की प्रत्येक काही मिनिटांनी काही नवीन अपलोड झाले का ते शोधणे आणि त्याला रिपोर्ट करणे. सो आपली ही एसआटीची सायबर टीम आहे, तिने महाराष्ट्र सायबरच्या मदतीने 4650 लिंक्स या डिलीट करून घेतलेले आहेत, त्याच पद्धतीने सोशल मीडियावरती आक्षेपार्ह पोस्ट पुन्हा पुन्हा टाकणाऱ्या एकूण 451 अकाउंटला कायमस्वरूपी काढून टाकण्यात आलेला आहे. तसेच, पीडिताचे आक्षेपार्ह व्हिडिओ प्रसारित केल्याप्रकरणी आत्तापर्यंत दोन गुन्हे देखील दाखल झालेले आहेत. सदरचे गुन्हे हे सातपूर पोलिस स्टेशन नाशिक शहर आणि कोपरगाव पोलिस स्टेशन अहिल्यानगर या ठिकाणी दाखल असून संबंधित घटकच त्याचा तपास करत आहेत आणि त्यामध्ये आजपर्यंत एकूण सहा आरोपींना अटक देखील करण्यात आली आहे.

