नाशिक : मांडवड येथील लष्करी सेवेत असलेले जवान संदीप भाऊसाहेब मोहिते हे लेह लडाख येथे मशीन ऑपरेटिंग करताना गुरुवारी (ता. १) हुतात्मा झाले. भारत माता की जय, वीर जवान अमर रहे अशा घोषणा देत हुतात्मा जवान मोहिते यांच्यावर मांडवड गावात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
जवान संदीप मोहिते हे १०५ इंजिनिअरिंग रेजिमेंटमध्ये हवालदार या पदावर कार्यरत होते. सन २००९ मध्ये ते भारतीय सैन्यदलात भरती झाले होते. अपघात झाल्याने त्यांना लेह लडाखच्या सैन्यदलाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून वीरगती प्राप्त झाल्याचे सांगितले. संदीप मोहिते यांनी पुणे येथील प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर चंदीगड, अरुणाचल प्रदेश, पठाणकोट येथे सेवा बजावली. याच दरम्यान साऊथ सुडान येथे विदेशात शांतीसैनिक म्हणून शांतीसेनेत त्यांनी काम केले होते. सध्या ते लेह लडाख येथे कार्यरत होते.
दरम्यान, गुरुवारी सकाळीसच पती-पत्नीमध्ये भ्रमणध्वनी वरुन संभाषण झाले होते. त्यांच्या मागे आई-वडील, पत्नी, देवराज (वय 5) दक्ष (वय 3) अशी दोन मुले आहेत. अंत्यसंस्कारादरम्यान कुटुंबियांकडून काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश होता. जवान संदीप मोहिते हे हुतात्मा झाल्यामुळे परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
The post जवान संदीप मोहिते अनंतात विलीन; काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

