सांगली: आटपाडी तालुक्यातील एका युवकाने जिद्दीच्या जोरावर यशाला गवसणी घातली आहे. मिटकी गावचा सुपुत्र प्रवीण उत्तम कोळपे याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेत 584वा रँक मिळवून आयपीएस (IPS) पदाला गवसणी घातली आहे.
गावकऱ्यांनी त्याची हत्तीवरून मिरवणूक काढली.
प्रवीणच्या घरात अठराविश्व दारिद्र्य आणि लहानपणीच वडिलांचे छत्र हरपलेले. आईने कष्ट करून आणि परिस्थितीशी दोन हात करत प्रवीणला शिकवले. अनेकदा पदरी निराशा आली, पण प्रवीणने जिद्द कायम ठेवली. मुलगा IPS झाल्याचे समजताच आईच्या डोळ्यांतील अश्रू कष्टाचे चीज झाल्याची साक्ष देत होते.

प्रवीणच्या यशाचे कौतुक करण्यासाठी ग्रामस्थांनी आटपाडी बस स्थानक ते पोलीस स्टेशन चौकापर्यंत प्रवीणची हत्तीवरून भव्य मिरवणूक काढली. ढोल-ताशांच्या गजरात आणि गुलाल उधळत संपूर्ण बाजारपेठ न्हाऊन निघाली होती. आमदार गोपीचंद पडळकर यांनी स्वतः हातात साखरेची बादली घेऊन पेठेतील नागरिक आणि व्यापाऱ्यांचे तोंड गोड केले. प्रवीणवर परिसरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

