पुणे: ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणात पुणे पोलिस दलातील दोन पोलिसांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. नाथा काळे आणि अमित जाधव असे या दोन पोलिसांची नावे असून हे दोघेही सध्या अटकेत आहेत.
ललित पाटील याला ससुन रुग्णालयातून पळून जाण्यास मदत केल्याचा आरोप या दोघांवर असून त्यांच्या बडतर्फीचे आदेश पुणे पोलिस आयुक्तांनी आज काढले आहेत. ललित पाटील हा ससुन रुग्णालयातून 1 ऑक्टोबर 2023 रोजी पळून गेला होता. यानंतर एकच खळबळ उडाली होती. त्यावेळी नाथा काळे आणि अमित जाधव हे दोन पोलिस कॉन्स्टेबल ससुन रुग्णालयातील केद्यांसाठीच्या 16 नंबर वॉर्डबाहेर पहारा देत होते. कर्तव्यात कसूर केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.
दरम्यान, अमली पदार्थ तस्कर ललित पाटील प्रकरणातील आरोपींबाबत संवेदनशील माहिती असलेला तीन पानांचा गोपनीय अहवाल पोलिसांनी न्यायालयात सादर केला आहे. या आरोपींचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन असलेल्या काही गोष्टी तपासातून समोर आल्या आहेत. ललित पाटील प्रकरणात आणखी चौघांची नावे निष्पन्न झाल्यानंतर त्यातील दोन आरोपी इमरान शेख उर्फ अतिक खान आणि हरिश्चंद्र पंत यांना पोलिसांनी अटक केली. या दोघांसह अकरा जणांची पोलिस कोठडी संपुष्टात आल्याने त्यांना सोमवारी न्यायालयात हजर केले.
या तपासावरून या टोळीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन असण्याची शक्यता नाकारता येत नाही. मेफेड्रोन ड्रग्जची निर्मिती, साठवण, वितरण याबाबतची माहिती तपासात उघड झाली असून, त्यातील प्रत्येकाचा सहभाग उघड झाला आहे. या प्रकरणाची व्याप्ती मोठी असून, या साखळीचा सखोल तपास करण्यासाठी आरोपींना पोलिस कोठडी देण्याची मागणी तपासी अधिकाऱ्यांनी केली.
या आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या मेफेड्रोनची किंमत बाजार भावाप्रमाणे 2 कोटी 14 लाख 30 हजार 600 रुपये आहे. आतापर्यंत या पदार्थांच्या विक्रीतून आरोपींनी आठ किलो सोन्याची बिस्किटे, चार चाकी वाहने, महागडे मोबाइल खरेदी केलेले आहेत. ही सर्व रक्कम सुमारे साडेपाच कोटी रुपयांच्या वर आहे.
The post ललित पाटील ड्रग्ज प्रकरणी पुणे पोलिसांची कारवाई; दोन पोलिस बडतर्फ… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

