जळगाव: मुंबई पोलिस दलात कर्मचारी असलेले शुभम अर्जुन आगोणे (वय २८ रा. चाळीसगाव) यांचा क्रिकेट स्पर्धेच्या वादातून धारदार तलवारीने वार करुन खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे चाळीसगाव तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे.
चाळीसगाव शहरात क्रिकेटचे सामने खेळले जात आहे. या सामन्यात मयत शुभम आगोणे यांचे एका गटासोबत किरकोळ वाद झाला होता. रविवारी (ता. १४) सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास हा वाद उफाळून आला. यात चार जणांनी शुभमवर तलवारीने सपासप वार करून गंभीर जखमी केले. ही घटना पाटणादेवी रोडवरील बामोशी बाबा दर्ग्याजवळ घडली. यात रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या शुभमला काही नागरिकांना तातडीने खासगी वाहनातून शहरातील खासगी रूग्णालयात हलविण्यात आले. डॉक्टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. शुभम यांच्या मृत्यूची माहिती कळताच नातेवाईकांनी एकच आक्रोश केला होता.
दरम्यान, चाळीसगाव शहरात खूनाची घटना घडल्यानंतर चाळीसगाव विभागाचे अपर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, चाळीसगाव शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक संदीप पाटील आणि सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेचा पंचनामा केल्यानतर शहर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत चार संशयितांना ताब्यात घेतले असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
The post मुंबई पोलिसकाकाचा चाळीसगावात क्रिकेटच्या वादातून खून… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

