Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
मुसळधार पावसामुळे मध्य प्रदेशातील नाल्याला आलेल्या पुरात ८ भाविक मृत्यूमुखी.

मुसळधार पावसामुळे मध्य प्रदेशातील नाल्याला आलेल्या पुरात ८ भाविक मृत्यूमुखी.

भोपाळ: मध्य प्रदेशातील आगर-माळवा जिल्ह्यातील नळखेडा येथील प्रसिद्ध माता बगलामुखी मंदिर परिसरात काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे, मंदिराजवळून वाहणाऱ्या नाल्याला आलेल्या पुरात, प्रवाशांनी भरलेली एक गाडी वाहून गेली.

या गाडीतील तीन मुले, तीन पुरुष आणि दोन महिलांसह आठ जण मृत्यूमुखी पडल्याचे वृत्त आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि प्रशासन घटनास्थळी दाखल झाले.

पोलिसांनी नाल्यातून गाडी आणि मृतदेह बाहेर काढून बचावकार्य सुरू केले. पोलीस सध्या अपघाताची परिस्थिती आणि कारणांचा तपास करत आहेत.

घटनेची माहिती मिळताच, स्थानिक प्रशासन आणि बचाव पथके तत्काळ घटनास्थळी दाखल झाली. पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून गेलेल्या गाडीचा आणि त्यातील प्रवाशांचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर बचाव मोहीम सुरू करण्यात आली.

घटनास्थळी मोठा जमाव जमला होता आणि पोलिसांनी त्यांच्यावर नियंत्रणात ठेवत बचाव कार्याची सूत्रे हाती घेतली. नळखेडा येथे घटनास्थळी दाखल झालेल्या आगर माळवाचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्यासमोर संतप्त लोकांनी घोषणाबाजी केली.

मिळालेल्या माहितीनुसार, गाडीतील लोक आगर माळवा जिल्ह्यातील नळखेडा येथील प्रसिद्ध ‘मा बगलामुखी’ मंदिराला भेट देण्यासाठी आले होते. लखुंदर नदीच्या काठावर वसलेले हे मंदिर एक प्रमुख धार्मिक स्थळ असून, देशभरातून भाविक येथे येतात.

नळखेडा येथे गेल्या २४ तासांत ३.७ इंच मुसळधार पाऊस झाला असून, रात्रीच्या वेळी पावसाचा सर्वाधिक जोर जाणवला. मुख्य रस्त्यावरून मंदिरात पोचण्यासाठी भाविकांना एक पूल ओलांडावा लागतो, ज्याच्या अगदी खालून पावसाच्या पाण्याचा नाला वाहतो.

मुसळधार पावसामुळे या नाल्यातील पाण्याचा प्रवाह अत्यंत वेगवान झाला होता, त्यामुळे हा भीषण अपघात घडला.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka