नाशिक: भोंदूबाबा अशोक खरात याच्या नाशिकच्या कॅनडा कॉर्नर येथे असणाऱ्या ओकस प्रॉपर्टी कार्यालयाची एसआयटी पथकाने तपासणी केली. या कार्यालयाच्या झाडाझडतीदरम्यान कार्यालयातील एक गोष्ट पोलिसांच्या नजरेत भरली.
अशोक खरातच्या केबिनमधील अत्युच्च दर्जाच्या काचा पाहून पोलिस थक्क झाले.
अशोक खरात याने बाहेरुन केबिनच्या आतले दृश्य दिसू नये यासाठी पुरेपूर काळजी घेतली होती. त्यामुळेच तो केबिनच्या बाहेर लोकांची गर्दी असतानाही आतमध्ये महिलांवर बिनधास्तपणे लैंगिक अत्याचार करायचा. अशोक खरात याच्या केबिनसह कार्यालयाची प्रत्येक काच अतिगडद काळ्या रंगाची आहे. या काचा अत्यंत उच्च दर्जाच्या आहेत. कितीही प्रयत्न केला तरी या काचेतून बाहेरुन आतले दृश्य दिसत नाही. याबाबत आज सरकारी वकिलांकडून न्यायालयात माहिती सादर केली जाण्याची शक्यता आहे.

अशोक खरात याच्याविरोधात आणखी काही महिलांनी लैंगिक अत्याचाराची तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे एसआयटीकडून (SIT) अशोक खरात याची पोलिस कोठडी वाढवून मागितली जाऊ शकते. आतापर्यंतच्या एसआयटीच्या तपासात अनेक महत्त्वाचे पुरावे हाती लागल्याची माहिती आहे. पोलिसांनी अशोक खरातने नरबळी दिल्याचा संशय व्यक्त केला होता. अशोक खरात याच्या पोलिस कोठडीची मुदत रविवारी संपुष्टात येत असून आज त्याला पुन्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. शनिवारी विशेष तपास पथकाने (एसआयटी) अशोक खरात याची तब्बल 10 तास कसून चौकशी केली. त्याच्याविरोधात आतापर्यंत एकूण 10 गुन्हे दाखल झाले असून यापैकी 8 गुन्हे हे लैंगिक अत्याचाराचे तर दोन गुन्हे हे फसवणुकीचे आहेत.

