Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पंढरपूर! युवतीवर लैंगिक अत्याचार; पीडितेनं ॲसिड पिऊन संपवलं जीवन.

पंढरपूर! युवतीवर लैंगिक अत्याचार; पीडितेनं ॲसिड पिऊन संपवलं जीवन.

सोलापूर : पंढरपूर तालुक्यातील पटवर्धन कुरोली येथे एका लैंगिक अत्याचार पीडित मुलीनं ॲसिड पिऊन आयुष्याचा शेवट केला आहे. पीडित मुलीने दीड महिन्यांपूर्वी ॲसिड प्राशन केले होते. यानंतर तिच्यावर पंढरपूर, सोलापूर, पुणे अशा विविध ठिकाणी उपचार सुरू होते.

मात्र तिची मृत्यूची झुंज संपली आहे. तिने सोलापूरात उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला आहे. या संतापजनक घटनेमुळे संपूर्ण सोलापूर जिल्हा हादरला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पंढरपूर तालुक्यातील पटवर्धन कुरोली येथे राहणाऱ्या एका युवतीवर गावातीलच एकाने अत्याचार केला होता. या अत्याचारामुळे युवतीने ॲसिड प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी ११ एप्रिल रोजी करकम पोलिस ठाण्यात रीतसर गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होऊन अनेक दिवस उलटले तरी पोलिसांकडून आरोपीला अटक करण्यात आली नाही.

दीड महिन्यांपासून पीडितेवर पंढरपूरसह पुण्यातील आणि सोलापूरातील रुग्णालयात उपचार सुरू होते. मागील दीड महिन्यांपासून तिची मृत्यूशी झुंज सुरू होती. आता अखेर पीडित मुलीचा मृत्यू झाला आहे. पीडितेच्या मृत्यूनंतर तिच्या कुटुंबातील सदस्यांचा संयम सुटला. संतप्त नातेवाईकांनी पीडितेचा मृतदेह रुग्णवाहिकेतून थेट करकम पोलिस ठाण्यात आणला. "जोपर्यंत मुख्य आरोपीला बेड्या ठोकल्या जात नाहीत, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही," अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली.

रविवारी रात्री तब्बल दोन तासांहून अधिक काळ पीडितेचा मृतदेह पोलिस ठाण्याच्या आवारात होता. नातेवाईकांच्या या आक्रमक पवित्र्यामुळे पोलिस प्रशासनाची मोठी धावपळ उडाली. यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी मध्यस्थी केली. पोलिसांनी नातेवाईकांना आश्वासन दिले की, संबंधित आरोपीला तातडीने अटक केली जाईल. तसेच या गुन्ह्यात आत्महत्येस प्रवृत्त करण्यासह कायद्यातील अधिक कडक आणि गंभीर कलमे वाढवली जातील, असे आश्वासन पोलिसांनी दिले. रविवारी रात्री तब्बल दोन धरणे आंदोलन केल्यानंतर नातेवाईकांनी माघार घेतली. त्यांनी शवविच्छेदनासाठी पीडितेचा मृतदेह रुग्णालयात पाठवला. या घटनेचा अधिक तपास करकम पोलिस करत आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka