पुणे : लोणावळ्यामध्ये आयटी कंपनीतील कर्मचाऱ्याने दरीत उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बाणेर येथे वास्तव्यास असलेल्या आणि हिंजवडी आयटी पार्क परिसरातील आयटी कंपनीत कार्यरत असलेल्या विरेंद्र सिन्हा (वय ३२) यांनी लोणावळ्यातील लायन्स (टायगर) पॉईंट परिसरात दरीत उडी मारून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी (ता.
१२) पहाटे उघडकीस आली. १२ फेब्रुवारी त्यांच्या पत्नीचा वाढदिवस होता. या घटनेमुळे आयटी क्षेत्रात तसेच स्थानिक परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
विरेंद्र सिन्हा यांची चारचाकी गाडी लायन्स पॉईंट येथे संशयास्पद स्थितीत पार्क केलेली आढळली. पहाटेच्या सुमारास त्यांनी आपल्या मित्रांना तसेच पत्नीला मेसेज आणि ई-मेलद्वारे टोकाचे पाऊल उचलणार असल्याचे सांगितल्याचेही समोर आले आहे. यानंतर स्थानिक पोलिसांना माहिती देण्यात आली आणि दरीत शोधमोहीम सुरू करण्यात आली. ज्या ठिकाणी गाडी उभी करण्यात आली होती, त्याच्याच समोरील दरीत सुमारे २०० ते २५० फूट खोलवर विरेंद्र सिन्हा यांचा मृतदेह आढळून आला. स्थानिक बचाव पथक 'शिवदुर्ग'च्या मदतीने सायंकाळी सुमारे ४.३० वाजता मृतदेह बाहेर काढण्यात आला आणि तो पुढील कार्यवाहीसाठी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला आहे.
पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!विशेष म्हणजे, पती-पत्नीमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मध्यरात्रीपासून पत्नीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता; मात्र त्यांचा फोन नंबर ब्लॉक असल्याने त्या दोघांचे बोलणं होऊ शकले नाही, अशी माहिती समोर आली आहे. पहाटेच्या सुमारास त्यांनी पत्नीला मेसेज आणि व्हिडिओ पाठवून आत्महत्येचा निर्णय कळवला आणि त्यानंतर दरीत उडी घेतल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या घटनेने त्यांच्या कुटुंबीयांवर आणि सहकाऱ्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास करत आहेत.
पुणे! IT इंजिनिअरची सातव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या; प्रेमप्रकरण की तणाव…

