पुणे: एका IT युवक-युवतीला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची आणि नोकरी घालवण्याची धमकी देत त्यांच्याकडून पैसे उकळणाऱ्या वाघोली पोलिस ठाण्यातील तीन कर्मचाऱ्यांना पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी निलंबित केले आहे.
पोलिस हवालदार किरण अब्दागिरे, पोलिस शिपाई गणेश खाडे आणि किरण कांबळे अशी निलंबन झालेल्यांची नावे आहेत.
वाघोलीतील एका सोसायटीत २ एप्रिल रोजी रात्री काही युवतींना आणून व्हिडिओ तयार केले जात असल्याची माहिती नियंत्रण कक्षाला मिळाली होती. या माहितीवरून बिट मार्शल म्हणून गस्त घालत असलेले गणेश खाडे आणि किरण कांबळे तिथे पोहोचले. त्यांनी तिथल्या एका युवक-युवतीला ताब्यात घेऊन पोलिस ठाण्यात आणले. ‘तुझ्यावर सेक्स रॅकेटचा गुन्हा दाखल करू, तुझी नोकरी जाईल आणि नातेवाइकांना बोलावू,’ अशी भीती हवालदार किरण अब्दागिरे यांनी दाखवली. पोलिस शिपाई गणेश खाडे याने युवकाला चापटी मारून दहशतीखाली ठेवले. यासोबतच युवतीला पोलिस ठाण्यात उभे ठेवून तिच्यावर मानसिक दबाव टाकण्यात आला.
Buy Maharashtrache Dada BookDiscount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949
संबंधित प्रकार मिटवण्यासाठी पोलिसांनी युवकाकडे पैशांची मागणी केली. अखेर एका गॅरेजच्या नावाचा ‘फोन पे’ क्यूआर कोड दाखवून १० हजार रुपये उकळले. मात्र, पोलिसांच्या संशयास्पद हालचालींमुळे युवकाने या प्रकरणाची चौकशी केली आणि सत्य समोर आले. पैसे उकळण्याच्या उद्देशाने हे सगळं केल्याचे समोर आले. हा गैरप्रकार पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या कानावर जाताच, त्यांनी या प्रकरणाची प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश दिले. चौकशीत तथ्य आढळल्यानंतर पोलिस उपायुक्त सोमय मुंडे यांनी तिन्ही कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश जारी केले. या कारवाईमुळे पोलिस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

