पुणे : पुणे शहरातील नवले पुलाजवळ झालेल्या अपघातामध्ये एकूण 8 जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात अभिनेता धनंजय कोळी (वय ३०) याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
नवले पुलाजवळ जड वाहणे एकमेकांना धडकल्यानंतर धनंजय कोळी याची कार देखील दोन वाहनांच्या मधोमध आली अन् कारचा चुराडा झाला. त्यातच धनंजय कोळी याचा मृत्यू झाला आहे. धनंजय कोळी याला तीन महिन्यांपूर्वी मुलगा झाला. अपघात झाला तेव्हा त्याची पत्नी आणि तीन महिन्याचा मुलगा लातूर येथे होते, तर आई-वडील पुण्यात असतात. तो आई-वडिलांकडे पुण्यात येत होता.
अभिनेता धनंजय कोळी हा मूळचा कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूर येथील आहे. गेल्या काही वर्षांपासून पिंपरी-चिंचवड येथील चिखली परिसरात राहत होता. धनंजय सहा महिन्यांपासून वाहतूक व्यवसाय करत होता. त्यापूर्वी तो एका खासगी कंपनीत काम करत होता. त्याने काही नाटकांमध्ये भूमिकाही केल्या आहेत. इन्स्टाग्रामवर त्याने स्वतःचा अभिनेता असा उल्लेख केला आहे.
'या अपघातात धनंजयचा हकनाक बळी गेला. आणि त्यांच्या तीन महिन्यांचा मुलावरचं वडिलांचं छत्र हरपलं, तो वडिलांच्या प्रेमाला पोरका झाला,' अशी भावना त्यांचे नातेवाइक व्यक्त करत आहेत. नवले पुलाजवळ झालेल्या अपघातात तीन महिन्यांच्या मुलाने पितृछत्र हरपल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. धनंजय कोळी पुण्यात राहून आपली नाटकांची आवडही जोपासत होता. अवघ्या काही दिवसांपूर्वीच धनंजयच्या पत्नीने त्याच्यासह शेअर केलेली डोहाळ जेवणाची पोस्ट या हसऱ्या कुटुंबाची शेवटची ठरली.

