पुणे: पुणे शहरचे माजी नगरसेवक वनराज आंदेकरच्या खुनाचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळी आक्रमक झाली आहे. आंदेकर टोळीने मागील तीन महिन्यात दोन खून केले आहेत. यामध्ये आयुष कोमकर आणि गणेश काळे याचा समावेश आहे.
आयुष कोमकर हा आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरचा नातू आहे.
वनराज आंदेकर खून प्रकरणातील मुख्य आरोपी समीर काळेच्या भावाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. आंदेकर टोळीच्या या वाढत्या कारवायांमुळे पुणे पोलिसांनी आंदेकर टोळीचा माज उतरवला आहे. पुणे पोलिसांनी आंदेकर टोळीतील मुख्य आरोपींची भररस्त्यात धिंड काढली आहे. बंडू आंदेकरचा मुलगा आणि आयुष कोमकर हत्या प्रकरणातील मास्टरमाइंड कृष्णा आंदेकर, अभिषेक आंदेकर आणि शिवराज आंदेकर यांची पुणे पोलिसांनी धिंड काढली आहे. आंदेकर टोळची प्रामुख्याने गणेश पेठेत आणि नाना पेठेत दहशत आहे. याच भागात पोलिसांनी बंडू आंदेकर याच्या तिन्ही पोरांची धिंड काढली आहे.
पुणे पोलिसांनी घर झडतीच्या निमित्ताने तिन्ही आरोपींना गणेश पेठेत नेले होते. यानंतर पोलिसांनी तिन्ही आरोपींची रस्त्यावरून धिंड काढली. परिसरातील आंदेकर टोळीचा दरारा कमी करण्यासाठी ही धिंड काढल्याची चर्चा आहे.

