पुणे : संक्रांतीनिमित्त साड्या खरेदी करण्यासाठी जात असताना सख्ख्या बहिणींच्या दुचाकीला ट्रकने जोरदार धडक दिल्याने दोघींचा मृत्यू झाला आहे. पिंपरी-चिंचवडच्या काळेवाडीतील बीआरटी मार्गावर तापकीर चौकाकडून काळेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर रहाटणी फाटा येथे बुधवारी (ता.
१४) दुपारी सव्वाच्या सुमारास ही घटना घडली. ऐन सणाच्या दिवशी दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
ऋतुजा पांडुरंग शिंदे (वय २४), नेहा पांडुरंग शिंदे (२०, दोघीही रा. पुनावळे) अशी मृत बहिणींची नावे आहेत. काळेवाडीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र बहिरट यांनी या अपघाताबाबत दिलेल्या माहितीनुसार, ऋतुजा शिंदे आणि नेहा शिंदे संक्रांतीनिमित्त साड्या खरेदीसाठी दुचाकीवरून जात असतानाच रहाटणी फाटा येथे त्यांच्या दुचाकीला ट्रकने धडक दिली. या अपघातात दोघींच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. त्यांना रुग्णालयात दाखल करताच डॉक्टरांनी मृत घोषित केले. ट्रकचालक नागपूर येथून वाटाणा घेऊन पुणे येथे आला होता. ती पोती उतरवून परतत असताना ही घटना घडली. जितेंद्र निराले (रा. खलघाट, जि. धार, मध्य प्रदेश) या ट्रकचालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!
ऋतुजा वकील होती. ताथवडेतून तिने कायद्याचे शिक्षण घेतले होते. नेहा कॉलेजची विद्यार्थिनी होती. त्यांचे वडील पांडुरंग शिंदे यांचा मिरची कांडपचा व्यवसाय आहे. आई कमल गृहिणी आहे. शिंदे दाम्पत्याला दोन मुली होत्या. दोघी आपल्या आई-वडिलांचा आधार होत्या, मात्र, दोघींच्या मृत्यूने शिंदे दाम्पत्याचा आधार गेला आहे. या घटनेनं हळहळ व्यक्त होत आहे.

