ठाणे: ठाणे शहरात रात्रीच्या वेळी कर्तव्यावर असताना गस्त घालणाऱ्या एका पोलिस अधिकाऱ्याची गावगुंडाने निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिस उपनिरीक्षक (PSI) किसन भोईर असे हत्या झालेल्या पोलिस अधिकाऱ्याचे नाव आहे.
या प्रकरणी चितळसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मुख्य आरोपी राजू वाल्मिकी याला पोलिसांनी तत्काळ बेड्या ठोकल्या आहेत.
पोलिस उपनिरीक्षक किसन भोईर हे रात्रीच्या सुमारास परिसरात नेहमीप्रमाणे गस्त घालत होते. गस्तीदरम्यान त्यांना गुप्त माहिती मिळाली होती की, परिसरातील काही दारूची दुकाने रात्री उशिरापर्यंत बेकायदेशीरपणे सुरू आहेत. या माहितीच्या आधारे PSI भोईर हे संबंधित ठिकाणी कारवाई करण्यासाठी पोहोचले. त्या ठिकाणी पोहोचल्यानंतर राजू वाल्मिकी नावाचा स्थानिक गावगुंड रस्त्यावरच उघडपणे दारू पीत बसलेला आढळला. सार्वजनिक ठिकाणी दारू पिणाऱ्या राजू वाल्मिकीला PSI भोईर यांनी हटकले आणि त्याला तत्काळ पोलिस व्हॅनमध्ये बसण्यास सांगितले.
पोलिस व्हॅनमध्ये बसण्याच्या कारणावरून आरोपी राजू वाल्मिकी आणि PSI किसन भोईर यांच्यात जोरदार बाचाबाची झाली. या बाचाबाचीदरम्यान संतप्त झालेल्या गावगुंड राजू वाल्मिकी याने पीएसआय भोईर यांना जोरात धक्का दिला. अचानक दिलेल्या तीव्र धक्क्यामुळे किसन भोईर यांचा तोल गेला आणि ते जमिनीवर थेट डोक्यावर आदळले. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने PSI किसन भोईर यांचा दुर्दैवाने जागीच मृत्यू झाला.
दरम्यान, या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. पोलिसांनी त्वरित सूत्रे हलवून हत्येतील मुख्य आरोपी राजू वाल्मिकी याला तत्काळ ताब्यात घेऊन अटक केली आहे. या प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाईसाठी ठाण्यातील चितळसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत. कर्तव्यावर असलेल्या पोलिसांवरच अशा प्रकारे हल्ला करून हत्या केल्याच्या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
पुणे! पोलिस अधिकारी गणेश तनपुरे यांचे हृदयविकाराने निधन; दोन दिवसांवर आली होती बदली…

