पुणे: वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील यांनी राज्याचे कारागृह पोलिस महानिरीक्षक डॉ. जालिंदर सुपेकर यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांच्या चौकशीची मागणी केली आहे.
यावर पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांनी आपली बाजू मांडली आहे.
अंजली दमानिया यांनी माध्यमांसमोर बोलताना सांगितले की, ‘सुपेकर यांची या प्रकरणात भूमिका संशयास्पद आहे आणि त्यांची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे.’ रुपाली ठोंबरे पाटील यांनीही सुपेकर यांच्यावर आरोप करत प्रकरणात उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे. दरम्यान, या आरोपांवर डॉ. जालिंदर सुपेकर यांनी आपली बाजू मांडताना सर्व आरोप फेटाळले आहेत.
डॉ. जालिंदर सुपेकर म्हटले आहे की, ‘मागील दोन वर्षापासून माझी नेमणूक प्रतिनियुक्तीवर तुरुंग विभागात झालेली आहे. त्यामुळे कार्यकारी पोलिस दलातील कोणताही घटक हा माझ्या आधिपत्याखाली नाही. त्यामुळे मी कोणाला सूचना देण्याचा संबंध येत नाही. हगवणे कुटुंबाबाबत मी कोणालाही कसलीही सूचना दिलेली नाही. त्यांनी केलेल्या कृत्याचा मी या अगोदरही निषेधच केलेला आहे. मी या प्रकरणाशी कुठलाही संबंध ठेवत नाही. सत्य समोर यायला हवं, मी चौकशीला तयार आहे.’
वैष्णवीच्या आत्महत्येनंतर अनेक धक्कादायक खुलासे झाले, त्यामध्ये हगवणे यांनी डॉ. जालिंदर सुपेकर यांचे पाठबळ आहे असे दाखवत मोठ्या सुनेला मयुरी हगवणेला देखील धमकावल्याचे समोर आले आहे. सुपेकर यांचे नाव आल्यानंतर त्यांच्यावर भ्रष्टाचार, शस्त्र परवाना देण्याच्या अधिकार, पोलिस निरीक्षक आत्महत्या याबाबत आरोप होत आहेत. पोलिस निरीक्षक आत्महत्या प्रकरणात आमचा दोष नसल्याचे न्यायालयात सिद्ध झाले आहे. तुरुंग विभागातील खरेदी 350 कोटी रुपयांची आहे. त्यामध्ये 500 कोटी रुपयांचा गैरव्यवहार होऊ शकत नाही. ती खरेदी ही शासनाने नेमलेल्या राज्य खरेदी समितीमार्फत होत असते. त्या समितीचा मी फक्त एक सदस्य आहे. तर शस्त्र परवाना देण्याचे अधिकार संबंधित पोलिस आयुक्तांना असतात. तत्पूर्वी त्या अर्जावर स्थानिक पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अनुकूल अथवा प्रतिकूल अहवाल संबंधित पोलिस उपायुक्तांना देतात, असेही डॉ. सुपेकर यांनी सांगितले. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा या प्रकरणात कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे म्हटले आहे.
The post वैष्णवी हगवणे प्रकरण! पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर म्हणाले… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

