Saturday, 23 Jan, 8.50 am पोलीसनामा

होम
ED कडून आमदार हितेंद्र ठाकूरयांच्या विवा ग्रुपची 9 तास चौकशी; मेहुल ठाकूरसह CA ला अटक, मनी लाँड्रिंग प्रकरण

मुंबई : पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी ईडीने बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष आणि वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर (hitendra thakur) यांच्या कुटुंबाच्या मालकीच्या विवा ग्रुपची तब्बल ९ तास चौकशी केली. त्यानंतर हितेंद्र ठाकूर (hitendra thakur) यांचे चुलत बंधु दीपक ठाकूर यांचा मोठा मोठा मुलगा मॉटी ऊर्फ मेहुल ठाकूर आणि त्यांच्या कंपनीचे कन्स्ल्टंट मदन गोपाल चतुर्वेदी यांना रात्री उशिरा ईडीने अटक केली आहे. आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

याच प्रकरणात शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांची ईडीने चौकशी केली आहे. अंमलबजावणी संचालयनालयाने शुक्रवारी पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणात बहुजन विकास आघाडीचे आमदार हितेंद्र ठाकूर यांचे कार्यालय आणि त्यांची कंपनी विवा ग्रुपच्या वसई -विरास तसेच पालघरमधील ठिकाणांवर छापे मारले. मनी लॉड्रिंगशी संबंधित प्रकरणाचा तपास करणार्‍या ईडीने एचडीआयएलकडून विवा ग्रुपला पाठवलेल्या रक्कमेबाबत हे छापे होते.

याबाबत आमदार हितेंद्र ठाकूर यांनी सांगितले की, सकाळी सात मोठ्या गाड्यांमधून ईडीचे ३५ ते ४० लोक आमच्या विरारमधील कार्यालयात आले होते. आमच्याकडे लपवण्यासारखे काही नाही. आम्ही तपासात ईडीला संपूर्ण सहकार्य करत आहोत. आमचे सर्व व्यवहार चेकद्वारे झाले आहेत.

पीएमसी बँकेच्या ६६७० कोटी रुपयांच्या घोटाळ्यात एचडीआयएल मुख्य आरोपी आहे. एचडीआयएल शी संबंधित कंपनी सांभाळणार्‍या प्रवीण राऊत यांना विवा ग्रुप ला निधी वळविण्याप्रकरणात संशयित म्हणून पाहिले जात आहे. ईडीने प्रिव्हेंशन ऑफ मनी लाँड्रिंग कायद्याअंतर्गत प्रवीण राऊत यांची आतापर्यंत ७२ कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली.

Dailyhunt
Disclaimer: This story is auto-aggregated by a computer program and has not been created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceNama
Top